Pune Crime News | गंगा फर्नहिल्स प्रकल्पातील फ्लॅट, पार्किंगची जागा परस्पर विक्री करुन सेल्स मॅनेजरने मिनामणी गंगा बिल्डरला घातला 2 कोटींचा गंडा
पुणे : Pune Crime News | सेल्स मॅनेजरने दोघांच्या मदतीने उंड्री येथील गंगा फर्नहिल्स या प्रकल्पातील फ्लॅट, पार्किंगची जागा, फर्निचर देण्याचे खोटे वायदे करुन ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना परस्पर पजेशन देऊन तब्बल २ कोटी ३ लाख ७८ हजार ९०५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
सेल्स मॅनेजर सायमन रॉनी पीटर Simon Rooney Peter (वय ४२, रा. एन आय बी एम रोड, कोंढवा), विक्रम सदाशिव अबनावे Vikram Sadashiv Abnave (वय ३८, रा. वारजे माळवाडी), बँक खातेदार बी चंद्रशेखर (रा. लँड मार्क, रेसिडेन्सी, द्वारका, गुडगाव, हरियाना) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत वरिष्ठ व्यवस्थापक किरण दादासाहेब शिंदे (वय ३८, रा. उंड्री) यांनी काळे पडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिनामणी गंगा बिल्डर यांनी गंगा फर्नहिल नावाने उंड्री येथे प्रकल्प सुरु केला आहे. त्यातील ए, बी, सी आणि डी या ४ इमारती पैकी ए बी आणि सी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
डी इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सायमन रोनी पीटर याला २ ऑगस्ट २०२४ मध्ये गंगा फर्नहिल या प्रकल्पावर सिनिअर सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीवर घेण्यात आले. गंगा फर्नहिल्स प्रकल्पाच्या टिममधील रोहित सिंग यांनी २३ मार्च २०२६ रोजी बंडगार्डन कार्यालयात येऊन कळविले की, सायमन पीटर याने गंगा फर्न हिल्स प्रकल्पामध्ये ग्राहकांकडून पार्किग आणि फ्लॅटचे पैसे घ्यायचे व हे पैसे तो कंपनीच्या खात्यावर न घेता त्याच्या खासगी खात्यावर घेतल्या आहेत. काही ग्राहकांकडून रोखीने रकमा स्वीकारल्या आहेत. ही माहिती मिळाल्यावर सायमन पीटर याला बोलावून घेण्यात आले. त्याने ही बाब मान्य केली. त्याचा मित्र बी चंद्रशेखर याच्या खासगी बँक खात्यात रक्कम स्वीकारल्याचे सांगितले. बिलापोटी खोट्या पावत्या दिल्याचे सांगितले. कंपनीचा गोल स्टॅम्पही त्यावर उमटविण्यात आला होता. किती पैसे घेतले असे विचारल्यावर त्याने ३५ लाख रुपये घेऊन कौटुंबिक कारणासाठी वापरल्याचे सागिंतले. हे पैसे देण्यास तयार असल्याबाबत त्याने कबुलीनामा करुन दिला आहे. त्याला या फसवणूकीमध्ये सी आर एम टिमचा विक्रम आबनावे यांनी मदत केली. त्याने ही माफीनामा लिहून दिला आहे.
कंपनीने या प्रकल्पाचे ऑडिट केले असताना सायमन पीटर व विक्रम आबनावे यांनी दोन सदनिका खरेदीदारांच्या नावे सिस्टिममध्ये पेमेंट मिळाल्याच्या काही बनावट एन्ट्री केल्या. त्या सदनिका धारकांना तात्पुरते पझेशन लेटर देण्यात आले. ग्राहकांना पझेशन मिळल्यानंतर पैसे मिळाले नसल्याबाबत जाणीवपूर्वक पुन्हा इंट्री केल्या आहेत. या दोघांनी सी आणि डी इमारतीमधील ३२ जणांकडून २ कोटी ३ लाख ७८ हजार ९०५ रुपये घेऊन त्यांना खोट्या पावत्या तयार करुन दिल्या. काही रोख रक्कमा स्वीकारल्या. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.
