Pune Crime News | पेट्रोल पंपात भागीदार करुन घेण्याचे आमिष दाखवुन तब्बल सव्वा दोन कोटींना घातला गंडा; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पेट्रोल पंप चालविण्यास घेतला असून त्यात भागीदार करुन घेण्याकरीता वेळोवेळी पैसे घेऊन एका इंजिनिअरची २ कोटी २९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
भुषण प्रभाकर वास्ते Bhushan Prabhakar Waste (वय ३५, रा. क़रकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कात्रजमध्ये राहणार्या एका ३७ वर्षाच्या इंजिनिअरने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रजमधील फिर्यादीच्या घरी नोव्हेंबर २०२१ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इंजिनिअर आहेत. त्यांची आणि आरोपी भुषण वास्ते याच्याबरोबर ओळख झाली. भुषण वास्ते याने कर्हाड जवळ सह्याद्री पेट्रोल पंप मित्रांच्या मदतीने चालविण्यास घेतला होता. या पेट्रोल पंपामध्ये भागीदार करुन घेतो, असे सांगून त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. भागीदार करुन घेण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी स्वत:च्या व सह्याद्री पेट्रोल पंपाच्या खात्यावर मोठ्या प्रमाणावर रक्कम घेतली. परंतु, त्यानंतर त्याने फिर्यादी यांना काहीही परतावा दिला नाही. मित्रांच्या मदतीने सुरु केलेल्या या पेट्रोल पंपामध्ये भुषण वास्ते याला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला. फिर्यादी यांनी परतावा देता येत नसेल, माझे पैसे परत कर, अशी मागणी केली. त्यानंतर त्याने काही पैसे परत केले. परंतु, वेळोवेळी मागणी करुनही त्याने २ कोटी २९ लाख ८ हजार ३०१ रुपये परत केले नाही. त्यामुळे आता फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी होऊन आता गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
