Pune Crime News | कंत्राटदाराकडून मध्यस्थामार्फत लाच स्वीकारणार्या दक्षिण कमांडमधील डिफेन्स अकाऊंटमधील सहायक लेखापरीक्षक; लेखापरीक्षकांसह कंत्राटदारांवर सीबीआयने केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कंत्राटदारांना मिळालेल्या १ कोटी २२ लाख रुपयांच्या कामासाठी अनुचित लाभ मिळविण्यासाठी मध्यस्थामार्फत ३ ठेकेदारांकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी सीबीआयने सहायक लेखा परीक्षक, लेखा परीक्षकांसह मध्यस्थ, ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
रक्षा लेखा विभागाचे सहायक लेखा अधिकारी सुभाष कुमार, लेखापरीक्षक उर्वशी कुमावत Urvashi Kumawat PCDA (दोघे रा. पीसीडीए (दक्षिण कमांड, पुणे), अदिनाथ दत्तात्रय पोपळकर Adinath Dattatray Popalkar (रा. बाणेगाव, सोलापूर) आणि कंत्राटदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अतिरिक्त संरक्षण लेखा नियंत्रक मणी वेलन के यांनी सीबीआयकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरंक्षण मंत्रालयाकडून मेसर्स सत्य नारायण सिक्युरिटी अँड मॅनपावर सोल्युशन (रा. ठाकरे कॉम्प्लेक्स, न्यू सिडको, नाशिक), मेसर्स जीनियस टेक्नॉलॉजी (रा.फुरसुंगी) आणि मेसर्स रुद्र व्हेंचर्स (रा. मांजरी) यांना १ कोटी २२ लाख रुपयांची कंत्राटे देण्यात आली होती. मेसर्स सुमित सेल्समार्फत मध्यस्थ अदिनाथ पोपळकर याने कंत्राटदारांकडून लाचची रक्कम गोळा करुन ती या लोकसेवकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले होते.
आदिनाथ पोपळकर याने नाशिक येथील सत्यनारायण सिक्युरिटी अँड मॅनपावर या कंत्राटदार संस्थेकडून फेब्रुवारी २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना त्याच्या बँक खात्यात ९४ हजार रुपये प्राप्त झाले होते़ त्याला मेसर्स रुद्र व्हेंचर्स या दुसर्या कंत्राटदार संस्थेकडून मार्च २०२५ ते मे २०२५ या कालावधीत १ लाख ६३ हजार रुपये आणि मेसर्स जीनिसय टेक्नॉलॉजी या तिसर्या कंत्राटदाराकडून मार्च २०२५ मध्ये १५ हजार रुपये मिळाले होते. आदिनाथ पोपळकर याने मे २०२५ मध्ये ८५ हजार ५०० रुपये उर्वशी कुमावत यांच्या अॅक्सिस बँकेतील खात्यात हस्तांतरीत केले. त्यानंतर उर्वशी कुमावत यांनी २३ मे २०२५ रोजी त्यांच्या खात्यातून सुभाष कुमार यांच्या बँक खात्यात ८५ हजार रुपये हस्तांतरीत केले होते. निधीच्या या क्रमवार हस्तांतरणावरुन सुभाष कुमार आणि उर्वशी कुमावत यांनी फायद्यासाठी एका मध्यस्थाद्वारे लाभाची रक्कम वळवली गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सीबीआयचे पोलीस निरीक्षक प्रदिप देवकर तपास करीत आहेत.
