Pune Crime News | नोकरीसाठी परदेशात पाठविण्याच्या नावाखाली महिलेला पोर्तुगालमध्ये वेश्या व्यवसायासाठी विकणार्‍या प्लेसमेंटच्या संचालिकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही त्या मोकाट

Pune Crime Court News

पुणे : Pune Crime News |  नोकरीसाठी परदेशात पाठविण्याच्या नावाखाली महिलेला पोर्तुगालमध्ये एका बिअर शॉपी विक्रेत्याला  वेश्या व्यवसायासाठी विकण्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला, परंतु, त्यातील संशयित आरोपींना ते पकडू  शकले नाहीत. त्यातील प्रमुख आरोपी प्रतिमा भाटी हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तिचा हा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्याला आठ दिवस होऊन गेल्यानंतरही पोलीस तिला अद्याप पकडू शकले नाही. अजूनही ती व तिचे साथीदार मोकाट आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर के क्षीरसगार यांनी प्रतिमा भाटी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज २४ ऑगस्ट रोजी फेटाळून लावला होता.

ही घटना विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी येथील यु जी ५ या कार्यालयात घडली होती. नागपूर येथील एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमिता भाटी, अमितकुमार झा, अजहर शेख, कपिल मिश्रा (सर्व रा. पुणे), तसेच वामसि, चैतन्य, हिम्मतसिंग (सर्व रा. पोर्तुगाल) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रतिमा भाटी हिच्या प्लेसमेंटच्या कार्यालयावर छापा टाकला. तेथे अनेक तरुण तरुणींची कागदपत्रे आढळून आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्व आरोपी फरार झाले आहेत. दरम्यान, प्रतिमा भाटी हिने सत्र न्यायालयात धाव घेत अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. प्रतिमा भाटी हिच्याविरुद्ध यापूर्वी २०२४ मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यातच अशाच प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रतिमा भाटी हिच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर के क्षीरसागर यांच्या समोर झाली. अर्जदाराच्या वकिलांनी तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. तिचा गुन्ह्याशी संबंध नाही. पोलिसांची जप्तीची कारवाई पूर्ण झाली आहे. तिला पोलीस कोठडीत घेऊन तपासाची आवश्यकता नाही, असा युक्तीवाद केला.

सरकारी वकील यांनी सांगितले की, आरोपीला जामीन मंजूर केला तर ती फिर्यादीच्या कागदपत्रात फेरफार किंवा हस्तक्षेप करु शकते. फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना मोठी रक्कम गुंतवण्यास आरोपीने सांगितले. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. याबरोबरच सरकारी वकील यांनी आरोपी आणि फिर्यादी यांच्यातील चॅटिंग, ई मेल्सच्या प्रिंट आऊटच्या स्वरुपातील कागदपत्रे तपासली. आरोपीचा मोबाईल अद्याप हस्तगत करायचा बाकी आहे. विविध पीडित व्यक्ती अजूनही त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी येत आहेत.

एफआयआर पाहता, प्रथमदर्शनी असे दिसून येते की त्यात आरोपी अर्जदाराची विशिष्ट भूमिका नमूद केली आहे.  या टप्प्यावर असे दिसते की गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. तसेच, अर्जदाराविरुद्ध अशाच प्रकारच्या गुन्ह्याबाबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही दिसून येते. तपासाची आवश्यकता असेल. गुन्ह्याचे स्वरूप पाहता, तपासासाठी अर्जदाराची कोठडीत चौकशी करणे आवश्यक ठरेल. जर अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर केला, तर ती तपासा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकते, ज्यामुळे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, असे प्रतिप्रादन करुन न्यायालयाने प्रतिमा भाटी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

या गंभीर गुन्ह्यात फसवणुक झालेले अनेक तरुण पुढे येत आहेत. तिच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रावरुन त्यांनी अनेकांना परदेशात पाठविण्याची तयारी केल्याचे दिसून येते. त्याशिवाय त्यात काही तरुणींची कागदपत्रे आहेत. हे पाहता या फिर्यादी प्रमाणे त्यांनाही वेश्या व्यवसायासाठी विकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही या प्रकरणातील एकही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

You may have missed