Pune Crime News | भाड्याने दिलेल्या खोलीचे कुलूप उघडून घरमालकाने घरातील साहित्य, सोन्याच्या  दागिन्यांचा अपहार करुन खोली दिली दुसर्‍याला भाड्याने, घरमालकावर ट्रेस पासचा गुन्हा दाखल

Crime

पुणे : Pune Crime News | भाड्याने घर दिले असताना भाडेकरु महिला घराला कुलूप लावून गावी गेल्या़ घरमालकाने कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, साहित्य याची विल्हेवाट लावून ती खोली दुसर्‍याला भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आंबेगाव पोलिसांनी घरमालकावर विनापरवाना प्रवेश केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

कविता ज्ञानेश्वर यामजले (वय ३३, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्राजक्ता शशिकांत कुलकर्णी Prajakta Shashikant Kulkarni (वय ५२) आणि त्यांचा मुलगा ओमकार शशिकांत कुलकर्णी Omkar Shashikant Kulkarni (वय २५, दोघे रा. शरयु कॉल्सीक सोसायटी, मोहननगर, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोंबर २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुळच्या लातूरच्या राहणार्‍या आहेत. त्या सुमारे दीड वर्षांपूर्वी पती व २ मुलांसह पुण्यात आल्या. त्यांनी कुलकर्णी यांच्या मालकीच्या लक्ष्मी अपार्टमेंटमधील तळमजल्याची खोली भाड्याने घेतली होती. खोलीमध्ये त्यांचे संसारोपयोगी सामान व दागदागिने होते. त्या ऑक्टोंबर २०२५ मध्ये खोलीला कुलूप लावून गावी निघून गेल्या होत्या. त्या अनेक महिने परत पुण्याला आल्या नव्हत्या. ऑगस्ट २०२६ मध्ये त्या पुन्हा पुण्यात आल्या. या दरम्यान घरमालकाने त्यांच्या खोलीचे मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तोडून राहते घरातील सामानाची विल्हेवाट लावली. यात ६० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व साहित्य होते. त्यांची खोली दुसर्‍याला भाड्याने दिल्याचे दिसून आले. त्यांनी खोलीतील सामानाविषयी विचारल्यावर घरमालकाने सामानाची विक्री केल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी इतक्या महिन्याच्या भाड्याचे पैसे देण्याची तयारी दर्शविली असून आपले सामान परत देण्याची विनंती केली. घरमालकाने त्यांची विनंती धुडकावल्यानंतर त्यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करीत आहेत.

You may have missed