Pune Crime News | पुणे : अंडरवर्ल्डला सुपारी देण्याची धमकी देऊन व्यावसायिकाची 1 कोटी 12 लाखांची फसवणुक; संजीव महाजन, निखील शेट्टी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक केल्यास होणार्या नफ्यात ५० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवुन व्यावसायिकाकडून १ कोटी ३९ लाख रुपये घेतले. काही महिने परतावा दिल्यानंतर पुढे पैसे देणे बंद केले. व्यावसायिकाने परतावा मागताच अंडरवर्ल्डला सुपारी देऊन जीवे मारून टाकू, खोट्या गुन्ह्यात अडकवुन टाकू अशी धमकी देऊन व्यावसायिकाची १ कोटी १२ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अविनाश भगवान कलवाणी (रा. नॉर्थ सोसायटी, सिझन मॉल मागे, मगरपट्टा, हडपसर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजीव शोरीलाल महाजन (Sanjeev Shorilal Mahajan) आणि आरती संजीव महाजन Aarti Sanjeev Mahajan (दोघे रा. क्रॉस रोड, कॅम्प), निखील करुणाकर शेट्टी Nikhil Karunakar Shetty (रा. फातिमानगर, वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील तेज हाऊस येथे १६ जुलै २०२१ ते २९ मे २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश कलवाणी हे व्यावसायिक असून ते अनेक कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. त्यांची व संजीव महाजन, निखील शेट्टी यांच्याशी कॅम्पमधील तेज हाऊस येथे भेट झाली होती. संजीव महाजन यांनी त्यांना तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुक केली तर, त्यात होणार्या नफ्यामध्ये तुम्हाला ५० टक्के वाटा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार कलवाणी यांनी वेळोवेळी एकूण १ कोटी ३९ लाख १५ हजार ८५१ रुपयांची गुंतवणुक केली़ संजीव महाजन व निखिल शेट्टी यांनी त्यांना वेळोवेळी २७ लाख १५ हजार ८५१ रुपये परतावा म्हणून काही महिने परत केले़ त्यानंतर त्यांनी पैसे देणे बंद केले़ फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली़ तेव्हा त्यांनी आता आम्ही मुंबईला आहोत, असे सांगून पुन्हा पैसे मागितले तर अंडरवर्ल्डला सुपारी देऊन जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवुन टाकू अशी धमकी दिली. त्यांनी काही दिवस ते पैसे परत करतील, याची वाट पाहिली. परंतु, ते पैसे परत करत नसल्याचे पाहून आपली फसवणुक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
