Pune Crime News | चार वर्षांपासून फरार असलेला खून व मोक्का प्रकरणातील आरोपी जेरबंद; पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-4 ची कर्नाटकात कारवाई
पुणे : Pune Crime News | खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-4 ने कर्नाटकातील बेळगाव येथे कारवाई करून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोईनुद्दीन जाफर शेख उर्फ मोईन कालू शेख Moinuddin Jafar Shaikh alias Moin Kalu Shaikh
(वय 28) असे आहे. त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात खुनासह शस्त्र कायद्याअंतर्गत तसेच खंडणी आणि मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता.
कर्नाटकात असल्याची मिळाली माहिती
तपासादरम्यान आरोपी कर्नाटक राज्यात असल्याची माहिती युनिट-4 च्या पथकाला मिळाली. त्याला गांजा सेवन आणि विक्रीची सवय असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती.
या आधारे कर्नाटकातील मागील चार वर्षांतील नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये 2024 मध्ये आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी वारंवार मोबाइल क्रमांक बदलत असल्याने त्याचा माग काढणे कठीण होत होते. मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तो थानागुंडी आणि बंगळुरू परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांचे वेशांतर; आरोपीचा बंगळुरूहून बेळगावपर्यंत पाठलाग
11 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्या नेतृत्वाखालील पथक खासगी वाहनातून बंगळुरूकडे रवाना झाले. आरोपीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी वेशांतर केले. पथकातील एक कर्मचारी चहा विक्रेता तर दुसरा मेकॅनिक बनून परिसरात पाळत ठेवत होता.
दरम्यान, आरोपीला संशय आल्याने तो पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच तेथून निघून गेला. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी बंगळुरूहून बेळगावच्या दिशेने जात असल्याचे समजताच पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला.
आरोपी सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करत असल्याचा संशय असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून धावत्या वाहनात कारवाई करण्यात आली नाही.
बेळगावमध्ये सापळा रचून अटक
बेळगाव येथे मालमारुती पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. त्यानंतर श्रीनगर चिल्ड्रेन गार्डन परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीची ओळख निश्चित करण्यात आली. संबंधित दोन्ही गुन्ह्यांमधील त्याच्या कथित सहभागाबाबत पुढील तपास करण्यात आला.
आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, सहायक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत, एकनाथ जोशी तसेच अमजद शेख, तुषार खराडे, अनिकेत भोसले, जहांगिर पठाण आणि विठ्ठल वाव्हळ यांच्या पथकाने केली.
