Pune Crime News | राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप गुलदस्तात ! 5 आरोपींना अटक करुनही पोलीस कोणत्याही निष्कषापर्यंत पोहचू शकले नाहीत; गोळीबाराबाबतही संशय कायम
पुणे : Pune Crime News | उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार करुन सत्तूरने वार केल्याची घटना १८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी घडली. या गुन्ह्यातील हल्लेखोरांसह त्यांना पैसे पुरविणार्या ७ संशयितांपैकी ५ जणांना पोलिसांनी अटक केली. राणासह त्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पोलिसांचे जाबजबाब नोंदविले गेले. घटनेला ८ दिवस झाले तरीही या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याच्या निष्कर्षापर्यंत ग्रामीण पोलीस पोहचू शकलेले नाही. त्याचबरोबर राणा सूर्यवंशी यांच्यावर गोळीबार ही संशयाच्या भोवर्यात अडकला आहे.
या गुन्ह्यातील ज्ञानेश्वर साळुंखे आणि निनाद महाडिक हे दोघे फरार असून त्यांना पकडल्यानंतर या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यावर येत्या २ ते ३ दिवसात या गुन्ह्यातील कारण आणि त्यात आणखी कोणा कोणाचा हात होता, हे समजू शकेल, असे पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल्ल यांनी सांगितले.
उद्योगपती आणि राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली असून एक अल्पवयीन ताब्यात आहे. ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. भिगवण), पार्थ वासुदेव अवथडे (वय १९, रा. कर्वेनगर), स्वप्नील भगवान कांबळे आणि चैतन्य उत्तम बाबर अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याशिवाय ज्ञानेश्वर साळुंके आणि निनाद महाडिक हे संशयित फरार आहे.
६ लाखांचे वाटप
राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हल्ला करणारे पोलिसांनी कर्वेनगरमधून पार्थ अवथडे व एका अल्पवयीनास ताब्यात घेतले़ त्यांच्याकडील चौकशीत ज्ञानदेव शिंदे या राणा याच्या चालकाचे नाव समोर आले. पोलिसांनी शिंदे याला अटक केली. त्याने या दोघांना २ लाख रुपये दिल्याचे तपासात उघड झाले. शिंदे याने पैसे पुरविले असले तरी हल्ला कधी, कोठे करायचा याबाबत माहिती कांबळे आणि महाडिक यांच्याकडून मिळाल्याचे या हल्लेखोरांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील कांबळे याला अटक केली आहे. प्रत्यक्षात सुपारी देण्याचे काम हे चैतन्य बाबर (रा. भिगवण) आणि ज्ञानदेव साळुंके (रा. भिगवण) यांनी केल्याचे तपासात समोर आले. हे दोघेही हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चैतन्य बाबर याला पकडल्यावर त्याने साळुंके याचे नाव पुढे केले आहे. या सर्व प्रकरणात कांबळे याला २ लाख, महाडिक याला २ आणि हल्लेखोर पार्थ व अल्पवयीन यांना २ लाख असे किमान ६ लाख रुपये दिले गेल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.
फायरिंग झाला की नाही संशयास्पद
या घटनेतील फिर्यादी जमीन एजंट याने फिर्याद देताना आपण गोळीबार झाल्याचा फट असा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. घटनास्थळावर असलेल्या काही जणांनी गोळीबार झाल्याचे सांगतात. तर, तेथे संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी गोळीबाराचा आवाज ऐकला नसल्याचे सांगतात. पोलिसांना याठिकाणी असलेल्या लोकांना हल्लेखोरांचे पिस्तुल म्हणून एक पिस्तुल दिले आहे. तसेच सत्तूरही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने घटनास्थळावर चोहो बाजूला तपासणी केली. त्यात एकही पुंगळी आढळून आली नाही. हल्लेखोरांनी हे आपले पिस्तुल नाही, गोळीबार केल्याचेही नाकारले आहे. त्यामुळे पोलिसांकडे हल्लेखोरांचा पिस्तुल म्हणून जे पिस्तुल जमा करण्यात आले आहे. ते बॅलेस्टिकतज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. या पिस्तुलातून गोळीबार झाला की नाही, हे ते तपासणी करुन अहवाल देतील, त्यानंतरच गोळीबार झाला अथवा नाही, हे स्पष्ट होणार आहे.
तीन जिल्ह्यांच्या पोलिसांचे संरक्षण
राणा सूर्यवंशी यांना पुणे ग्रामीणसह गहचिरोली, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलिसांचे संरक्षण होते. सूर्यवंशी यांना अनेक वर्षांपासून वाय प्लस (अवर्गीकृत) संरक्षण पुरविण्यात येते. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून चालक आणि २ पोलीस अंमलदार अशी सुरक्षा व्यवस्था राणा यांना पुरविण्यात येते. हल्ला झाला त्यावेळी राणा सूर्यवंशी यांनी पोलिसांना तुम्ही पुढच्या गाडीत थांबा असे सांगितले होते. सोलापूर पोलीस दलातील पोलीस अंमलदाराने हल्लेखोरांपैकी एकाला पकडले होते. परंतु, तो त्याच्या हाताला चावा घेऊन पळून गेला होता. या सर्व पोलिसांचे जाबजबाव ग्रामीण पोलिसांनी घेतले आहे.
या प्रकरणात रोहीत तुपे, विशाल धुमाळ हे पोलिसांच्या रडारवर आहेत. ते यापैकी कोणा कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे, असे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
राणा सूर्यवंशी यांनी आपल्याला व्हीआयपी सारखा बंदोबस्त मिळावा, यासाठी हा हल्ला स्वत:च घडवून आणला की या हल्लामागे आणखी दुसरेच काही कारण होते, हे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये उघड होऊन या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
