Pune Crime News | वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांना टारगेट करण्याचा आंदेकर टोळीचा तिसरा प्रयत्न; 2 वर्षात दोघांचा खुन, एकाच्या खुनाचा प्रयत्न, आंदेकर-कोमकर टोळी युद्ध कसे झाले सुरु वाचा सविस्तर
पुणे : Pune Crime News | वर्चस्ववादातून आंदेकर टोळीमध्येच सुरु झालेल्या गृहयुद्धात आतापर्यंत तिघांचा बळी गेला असून बुधवारी चौथ्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आंदेकर -कोमकर टोळी युद्धातील ३ डझनहून अधिक गुंड तुरुंगात गेले असतानाही हे टोळी युद्ध काही थांबताना दिसत नाही.
कोमकर यांच्या दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. वनराज आंदेकर याची बहिण संजिवनी कोमकर व इतरांचा ही कारवाई माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा संशय होता. त्यातून या दोन कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. अगोदरपासून त्यांच्यात संपत्ती व वर्चस्वावरुन धुसपूस सुरु होती. अतिक्रमण विभागाच्या कारवाईने त्या आगीत तेल ओतले गेले. त्याचा भडका उडला तो वनराज आंदेकर याच्या हत्येने. १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या खुनाने पुणे शहरात एकच खळबळ उडाली.
सोमनाथ गायकवाड टोळीचा सदस्य निखिल आखाडे याचा ऑक्टोंबर २०२३ मध्ये खुन करण्यात आला होता. त्यात बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली होती. वनराज नगरसेवक असल्याने त्यांना जामीन मिळाल्याचा सोमनाथ गायकवाड याला संशय होता. त्यामुळे तो वनराज आंदेकरचा सुड घेण्याची संधी पहात होता.
वर्चस्ववादातून आंदेकर टोळीत असलेल्या कोमकर यांनी स्वत:ची टोळी निर्माण केली. कोमकर याला सोमनाथ गायकवाड याची साथ मिळाली. त्यातून या दोन्ही टोळ्या एकत्र येऊन वनराज आंदेकरचा काटा काढण्यात आला होता. सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह २२ आरोपींना अटक करण्यात आली होती. वनराज आंदेकर याच्या खुनामुळे आंदेकर टोळीला मोठा हादरा बसला होता. त्यामुळे त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला होता.
आपले वर्चस्व पुन्हा स्थापित करण्यासाठी काही करणे गरजेचे आहे, असे या टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर याला वाटू लागले. बदला घ्यायचा तर खुन करणार्या सर्वांना पोलिसांनी आत घातले होते. त्यामुळे या टोळीने खुनातील आरोपीच्या नातेवाईकांकडे आपला मोहरा वळविला. वनराज च्या हत्येतील आरोपींचे काही नातेवाईक आंबेगाव पठार परिसरात राहत होते. बंडु आंदेकर याने दत्ता बाळू काळे व यश मोहिते यांना आंबेगाव येथे रेकी करण्यासाठी पाठविले होते. परंतु, स्थानिक तरुणांना संशय आल्याने त्यांनी या दत्ता काळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांच्या चौकशीत वनराज आंदेकर याच्या खुनातील प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाड याच्या नातेवाईकांना मारण्याचा प्लॅन असल्याचे उघड झाले होते. बंडु आंदेकर याचा हा कट उधळला गेल्याने आंदेकर टोळीने वनराज याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष (वय २०, रा. लक्ष्मी सोसायटी, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) याचा सोसायटीच्या आवारात गोळीबार करुन खून ५ सप्टेंबर २०२५ रोजी केला होता. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याचा खून करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा नातू होता. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह कृष्णा आंदेकरसह १३ जणांना पोलिसांनी अटक केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदेकर टोळीचे वर्चस्व मोडून काढण्याचा निर्धार केला. त्यातून त्याच्या बेकायदेशीर जागा, इमारती यांच्यावर महापालिकेच्या मदतीने कारवाई करुन त्या भुईसपाट करण्यात आल्या. खंडणीचे अनेक गुन्हे दाखल करुन त्याचे आर्थिक पाठबळ कमी करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ रोजी आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठी आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश किसन काळे (वय ३२, रा. येवलेवाडी, कोढवा) याचा कोंढव्यातील खडी मशीन चौकात गोळ्या झाडून खून केला होता. गणेश काळे हा रिक्षाचालक होता. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिल्याप्रकरणी समीर काळे, आबा खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना अटक करण्यात आली होती.
यातील पिस्तुल पुरविणार्यांमधील आकाश म्हस्के याचा भाऊ अक्षय म्हस्के हा आंदेकर टोळीच्या रडारवर होता. अक्षय म्हस्के हा धनकवडी फाटा येथे रिक्षात बसला असताना बुधवारी २० मे रोजी दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्याच्यावर प्रथम गोळीबार केला. जखमी होऊन तो खाली पडला असताना त्याच्यावर कोयत्याने वार करुन ते चौघे स्वारगेटच्या दिशेने पळून गेले. पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत. आजच्या या घटनेने आंदेकर व कोमकर टोळीतील युद्ध पुन्हा चर्चेत आले आहे.
