Pune Crime News | तीन वेळा जबाब बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न; उसने पैसे न दिल्याने झालेल्या वादात डिलिव्हरी बॉयने मित्राच्या छातीत चाकूने वार करुन केला खुन
पुणे : Pune Crime News | जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यु झाला. त्याला रुग्णालयात दाखल करणार्या मित्राने दोन दिवसात वेगवेगळे जबाब देत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्व बाजूने केलेल्या तपासामुळे शेवटी त्याला खरे कारण सांगून खुनाची कबुली द्यावी लागली.
आशीष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. राहुल राजेंद्र जवंजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जवंजाळ हा मुळचा अमरावती येथील राहणारा आहे. तो पुण्यात एकटाच असतो, तर, आशिष मगर हा मावशीकडे राहतो. दोघेही पूर्वी एका बीपीओमध्ये काम करत होते. तीन महिन्यांपूर्वी ती नोकरी सोडून ते झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करु लागले. ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता मणीपाल हॉस्पिटलमधून पोलिसांना फोन आला.
राहुल जवंजाळ याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणले असता त्याचा मृत्यु झाला आहे. त्याच्याबरोबर असलेल्या आशिष मगर याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, राहुल याचा फोन आला होता. त्याने सांगितले की, अर्जंट रुमच्या खाली ये, मला लागले आहे. त्यामुळे मी रुमच्या खाली गेलो. त्यावेळी त्याच्या मानेजवळ जखम झालेली होती. त्यातून रक्त येत होते. त्याला दवाखान्यात आणले असता त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आशिष मगर याच्या या सांगण्यावर पोलिसांना संशय आल्याने पोलीस त्याला घेऊन राहुल याच्या रुमवर गेले. तेथे गेल्यावर त्याने अगोदर सांगितलेल्या हकीकतीमध्ये बदल केला. आशिष याने आता सांगितले की, ते दोघे झोमॅटोवर एकाच गाडीवरुन डिलिव्हरीचे काम करत होते. राहुलने त्याला सायंकाळी ६ वाजता फोन करुन बोलावून घेतले. आशिष मगर त्याच्या रुमवर गेला. तो बाथरुममध्ये गेला असताना राहुल याच्या ओरडण्याचा आवाज आला.
तेव्हा आशिष वॉशरुममधून बाहेर आला. तेव्हा राहुल जवंजाळ हा घरातील चाकूने स्वत:चे छातीमध्ये मारुन घेतल्याने रक्त येऊ लागले होते. त्याला अॅक्टीव्हावर मागे बसवुन हॉस्पिटलमध्ये जात असताना थोड्या अंतरावर गेल्यावर राहुल बेशुद्ध झाल्याने त्याला रिक्षाने प्रथम निरामय हॉस्पिटल व तेथून मणीपाल हॉस्पिटल येथे नेले, असे त्याने सांगितले. पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅनला बोलावून घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. रक्ताने भरलेले ब्लँकेट, टॉवेल जप्त केले. दुचाकीवर रक्ताचे डाग होते. गाडीही जप्त करण्यात आली. त्यानंतर दुसर्या दिवशी राहुल याची आई आल्याने पोलिसांनी शवविच्छेदन केले. त्यात खोलवर जखम झाल्याने मृत्यु असे मृत्युचे कारण डॉक्टरांनी दिले. त्यामुळे आशिष मगर हा सांगत असलेल्या हकीकतीविषयी पोलिसांना संशय वाटत होता.
९ सप्टेंबर रोजी जवळपास दिवसभर पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते. शेवटी रात्री उशिरा आशिष मगर याने तिसर्यांना जबाब बदलला. तेव्हा त्याने सांगितले की, मी राहुल जवंजाळ याला ६०० रुपये उसने पैसे दिले होते. त्याने वेळेमध्ये पैसे परत दिले नाही. त्याला पैशांसाठी अनेकदा फोन केले. परंतु त्याने फोनला प्रतिसाद न दिल्याने मी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्याच्या खोलीवर गेलो. तेथे आमच्यामध्ये पैशांवरुन वाद झाला. तेव्हा राहुल जवंजाळ याने घरातील चाकू घेऊन ‘‘हातसे क्या मारता है, चाकूसे मार’’ असे म्हणाला. तेव्हा मी नाही म्हणत असताना त्याने चाकू माझ्या हातात दिला. तेव्हा राहुलने मला आई वडिलांवरुन शिवीगाळ केल्याने त्या रागाच्या भरामध्ये मी तो चाकू राहुलच्या छातीमध्ये जोरात भोकसल्याने त्याला जखम होऊन त्यातून जास्त प्रमाणात रक्त येऊ लागले. मी घाबरुन गेलो. घरातील टॉवेल घेऊन राहुल याचे जखमेवर धरला. त्याला उठवून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जिन्याने चालत बिल्डिंगचे खाली आणले. त्याच्या अॅक्टीव्हावर बसवुन हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालो. परंतु, थोड्या अंंतरावर तो बेशुद्ध झाल्याने गाडीवरुन पडला. तेव्हा गाडी तेथेच सोडून रिक्षामध्ये घालून त्याला प्रथम निरामय हॉस्पिटल येथे नेले व तेथून मणीपाल हॉस्टिल येथे नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन तो मृत्यु पावल्याचे सांगितले.
आशिष मगर याने सांगितलेली हकीकत, घटना स्थळी मिळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे, शवविच्छेदनाचा अहवाल यावरुन राहुल जवंजाळ याला आशिष मगर याने पैशांच्या देवाण घेवाणीच्या कारणावरुन छातीत चाकू भोकसून जीवे मारल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आशिष मगर याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करीत आहेत.
