Mantralaya News | मंत्री कार्यालयांतील 550 अधिकारी-कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परतण्याचे आदेश; मंत्रालयात खळबळ, CM फडणवीस यांच्या कार्यालयाच्या देखरेखीखाली कारवाई
मुंबई : Mantralaya News | कोणतीही विहित प्रक्रिया न पाळता मंत्री कार्यालयांमध्ये उसनवारी, मौखिक आदेश किंवा अन्य मार्गाने कार्यरत असलेल्या सुमारे ५५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री कार्यालयांतील तात्पुरत्या पदांसाठी स्वतंत्र रचना निश्चित करण्यात आली होती. महायुती सरकारने मंत्रालयीन कार्यालयांसाठी एकूण ९०४ तात्पुरती पदे मंजूर केली होती. त्यापैकी ४० मंत्रालयीन कार्यालयांतील ५४९ पदे विहित प्रक्रियेनुसार भरण्यात आली होती.
मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या आढाव्यात आणखी सुमारे ५५० अधिकारी आणि कर्मचारी कोणतीही अधिकृत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण न करता विविध मंत्री कार्यालयांमध्ये कार्यरत असल्याचे समोर आले.
२५ ऑगस्टलाच दिले होते आदेश
राज्य सरकारने २५ ऑगस्ट रोजी आदेश जारी करून नियमबाह्य पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करून त्यांना मूळ विभागात परत पाठवण्याचे निर्देश दिले होते.
संबंधित कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आदेशाचे पालन न केल्यास वेतन रोखण्याचा इशाराही देण्यात आला होता. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लक्ष ठेवण्यात येत होते.
चार मंत्र्यांचे खासगी सचिवही परत
या कारवाईचा परिणाम महायुतीतील तिन्ही पक्षांच्या मंत्री कार्यालयांवर झाल्याचे सांगितले जात आहे. चार मंत्र्यांचे खासगी सचिवही त्यांच्या मूळ विभागात परतले असून, त्यामुळे काही मंत्री कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, यापुढे मंत्री कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती विहित प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतरच केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
