Pune Crime News | अंमली पदार्थांची तस्करी करणार्या गुंडावर एमपीडीए कारवाई, वाशीम कारागृहात केले स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | अंमली पदार्थांची तस्करी करणारा, हत्यार बाळगून लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणार्या सराईत गुंडाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केली. त्याची एक वर्षासाठी वाशीम कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
आर्यन विनोद पवार Aryan Vinod Pawar (वय २१, रा. माळी आळ, बावधन) असे या गुंडाचे नाव आहे.
आर्यन पवार हा सराईत गुन्हेगार असून २०२४ पासून पुणे शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे, हत्यार बाळगणे, अंमली पदार्थ विकणे, दुखापत करणे, मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, जाळपोळ करुन मालमत्तेचे नुकसान करणे, चिथावणी देणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकांमध्ये त्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव, अनिल बारड, कैलास केंद्रे यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठविला. अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन आर्यन पवार याला एक वर्षासाठी वाशिम कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. आर्यन पवार याला पकडून नांदेड सिटी पोलिसांनी त्याला वाशिम कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलिसांनी केली आहे.
