Pune Crime News | दिवंगत उद्योगपती रतन टाटांच्या नावे ‘डीपफेक व्हिडीओ’ पाठवून महिलेची फसवणूक
पुणे : Pune Crime News | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचा डीपफेक व्हिडिओ तयार करुन फसवणुकीच्या घटना समोर आल्यानंतर आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी बनावट व्हिडीओ तयार करुन एका महिलेची ४ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत आंबेगाव येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर फिर्यादी महिलेने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा बनावट व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओतील एक लिंक उघडल्यानतंर महिलेला सायबर चोरट्यांनी एक मायक्रोसॉफ्ट टीम अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर मधूमोहन नावाच्या व्यक्तीने महिलेशी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात ४ लाख ९ हजार १०० रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.
