Pune Crime News | शेजार्‍यांकडून झालेल्या मारहाणीत महिलेचा गर्भपात, समर्थ पोलिसांनी बहिण भावावर केला गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मोटारसायकलीचे चाक पायावरुन गेल्याने झालेल्या वादात पतीला मारहाण होत असल्याचे पाहून पत्नीने आरडाओरडा केला. त्यावरुन शेजारी राहणार्‍याच्या बहिणीने पत्नीला मारहाण केली. भावाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी बहिण भावावर गुन्हा दाखल केला आहे.

सज्जाद बबलु मेमन (Sajjad Bablu Memon) आणि सना बबलु मेमन Sana Bablu Memon (दोघे रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३७ वर्षाच्या तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार भवानी पेठेतील रामप्रसाद चिवडावालाजवळ १ ऑक्टोंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री ९ वाजता घरासमोर उभे होते. त्यावेळी सज्जाद मेमन हा मोटारसायकलवरुन आला. त्याचे चाक फिर्यादी यांच्या पायावरुन गेले. तेव्हा त्यांनी तुझ्या गाडीला हॉर्न नाही का असे म्हटले. त्यावर सज्जाद याने गाडी बाजूला लावून फिर्यादी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांची पत्नी घराच्या दारात उभी होती. ती गरोदर असल्यामुळे भांडणामध्ये आली नाही. ती मोठ्याने माझ्या पतीला वाचवा, असे ओरडु लागल्याने शेजारी राहणारे तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना होणारी मारहाण थांबवली.

हे पाहून सज्जाद याची बहिण सना मेमन ही फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावर धावुन गेली. तिचे केस पकडून तिला मारहाण करु लागली. त्यांच्या भांडणामध्ये सज्जाद गेला. त्याने पत्नीच्या पोटात लाथ मारली. त्यामुळे पत्नी खाली पडली. तिचा रक्तस्त्राव सुरु झाला. तिला ससून रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी  पत्नीचा गर्भपात झाल्यामुळे रक्तत्राव झाल्याचे सांगितले. पत्नी गर्भवती असताना सना व सज्जाद मेमन यांनी मारहाण केल्याने  पत्नीचा गर्भपात होण्यास कारणीभूत असल्याच्या आरोपावरुन दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तानाजी शेगर तपास करीत आहेत.

You may have missed