Pune Crime News | ‘तुझ्या भावासारखा तुझाही मर्डर करतो’ ! मर्डर करण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्या दोघांना खडकी पोलिसांनी केले गजाआड
पुणे : Pune Crime News | तुझ्या भावाचा जसा मर्डर केला, तसा तुझाही मर्डर करतो, अशी धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. खडकी पोलिसांनी खंडणी मागणार्या दोघांना अटक केली आहे.
अमन विशाल जाधव Aman Vishal Jadhav (वय १९, रा. आंबेडकर चौक, औंध रोड) आणि लकी ऊर्फ करन रवींद्र नायडु Lucky alias Karan Ravindra Naidu (वय १९, रा. मुळा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रियंका विशाल जाधव (वय ३५) आणि अमृता रवींद्र नायडु (वय ३५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मंगल प्रदिप भोसले (वय ४७, रा. कांबळे वस्ती, औंध रोड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना औंध रोडवरील कांबळे वस्ती येथे २ ऑक्टोंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून धीरज प्रदीप भोसले (वय २२) याचा २ जानेवारी २०२४ रोजी भरदिवसा खुन करण्यात आला होता. खडकी पोलिसांनी तेव्हा दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. जुने भांडण आणि बदल्याच्या भावनेतून हा खुन करण्यात आला होता. तेव्हापासून या कुटुंबांमध्ये धुसफूस सुरु होती. २ ऑक्टोंबर रोजी पहाटे आरोपी कांबळे वस्तीत आले. त्यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन हातातील कोयते दरवाज्यावर मारले. फिर्यादी यांचा मुलगा पियांशु याला ‘‘तुझा आज मर्डर करतो,’’ असे म्हणून शिवीगाळ केली़ ‘‘आम्हाला ३ ते ४ लाख रुपये दे, नाही तर तुझा देखील भावासारखा मर्डर करु,’’ अशी धमकी दिली. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमले. तेव्हा त्यांना उद्देशुन कोणी मध्ये आले तर त्यांनाही मारु असे म्हणून आरडाओरडा करत तेथून ते निघून गेले. खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक दत्ता गुळींग तपास करीत आहेत.
