Pune Pimpri Crime News | चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; उपचारादरम्यान महिला रुग्णाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डॉक्टर अटकेत

Pune-Pimpri Crime News | Shocking incident in Chinchwad; doctor arrested for misconduct with a female patient during treatment.

पिंपरी: Pune Pimpri Crime News | पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ३७ वर्षीय महिला रुग्णाशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. उपचार प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप संबंधित डॉक्टरवर करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार डॉ. धैर्यशील शेटक Dr. Dhairyashil Shetak (वय २७) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला संभाजीनगर, चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास डॉक्टर वॉर्डमध्ये आले आणि उपचाराचा भाग म्हणून पायाला लावलेले स्टॉकिंग व्यवस्थित करण्याचे कारण सांगितले. त्यानंतर त्यांनी महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर महिलेने तत्काळ आक्षेप घेत हा प्रकार आपल्या नातेवाइकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली आणि पुढे निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून संशयित डॉक्टरला अटक केली आहे. घटनेच्या वेळी रुग्णालयातील परिस्थिती, कर्मचारी आणि संबंधित नोंदींची पडताळणी करण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

You may have missed