Pune Crime Court News | पुणे : राजगड पोलिसांना न्यायालयाचा दणका; 80 लाखांचा जप्त पानमसाला आणि तंबाखू व्यापाऱ्याला परत देण्याचे आदेश
पुणे : Pune Crime Court News | बंदी असलेल्या पानमसाला आणि तंबाखूच्या कारवाईप्रकरणी राजगड पोलिसांना पुणे न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. जप्त करण्यात आलेला ट्रक नेमका कुठे पकडण्यात आला आणि त्यातील माल महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात होता का, हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने तब्बल 80 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल तात्पुरता संबंधित व्यापारी कंपनीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांनी हा आदेश देताना जप्त करण्यात आलेला पानमसाला आणि तंबाखू हे नाशवंत स्वरूपाचे पदार्थ असल्याचे नमूद केले. तपास अंतिम टप्प्यात असल्याने हा माल तात्पुरता व्यापाऱ्याच्या ताब्यात देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, हा मुद्देमाल महाराष्ट्राच्या हद्दीत कुठेही उतरवला जाणार नाही, अशी अटही घालण्यात आली आहे.
या प्रकरणात राजस्थानमधील जोधपूर येथील एका व्यापाऱ्याने विजापूरमधील व्यापाऱ्याकडून 115 गोण्या पानमसाला आणि 25 गोण्या तंबाखू खरेदी केली होती. हा माल राजस्थानला नेला जात असताना राजगड पोलिसांनी 28 एप्रिल रोजी ट्रक अडवून कारवाई करत मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने न्यायालयात धाव घेत जप्त माल परत मिळण्याची मागणी केली होती.
व्यापाऱ्याकडे तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचा वैध परवाना असून, कर्नाटक आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये संबंधित पानमसाला आणि तंबाखूवर बंदी नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. तसेच, झळकी सीमेवरील तपासणी नाक्यावरून ट्रक महाराष्ट्राच्या हद्दीत आणून पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा व्यापाऱ्यांचे वकील अॅड. आकाश कोंडे यांनी न्यायालयात केला.
