Pune Cyber Crime | सायबर टोळीतील फरार ‘रिलस्टार’ला सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; डिजिटल अरेस्ट दाखवून पावणे अकरा कोटींची केली होती फसवणूक  

Pune Cyber ​​Crime | Cyber ​​police arrest absconding ‘Reel star’ from cyber gang; had swindled ₹10.75 crore by staging a ‘digital arrest’.

पुणे: Pune Cyber Crime | ज्येष्ठ नागरिकास डिजिटल अरेस्टची भीती दाखवून १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी फरार रिल स्टारला बेड्या ठोकल्या आहेत.

रोहन रामेश्वर जाधव Rohan Rameshwar Jadhav (वय २६, रा. सूर्या अपार्टमेंट, गजानन नगर, पिंपळे गुरव) असे या आरोपीचे नाव आहे. रोहन जाधव हा मुळचा छत्रपती संभाजीनगरचा असून तो २०२२ पासून पिंपळे निलख येथे रहायला आहे. रिलस्टार म्हणून तो काम करीत होता. त्याचे शिक्षण बी एससी झालेले आहे.

नरेश गोयल याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात तुमच्या आधार कार्डवरुन बँकेत बनावट खाते उघडण्यात आले आहे़ त्या खात्यावर २४ लोकांची फसवणुकीची तक्रार असल्याचे सांगून तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा अटक होऊ शकते, अशी भिती घालून ज्येष्ठ नागरिकाकडे असलेली सगळी गुंतवणुक ट्रान्सफर करायला भाग पाडले होते. ही घटना २३ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान घडली होती़ पोलिसांनी यापूर्वी हर्षद सुभाष धनतोले (वय २६, रा. कर्वेनगर), समर्थ सुरेश देशमुख(वय २४, रा. कर्वेनगर), प्रणव करणसिंग आर्या (वय ३१, रा. ग्रेटर नोयडा, दिल्ली) यांना अटक केली होती.

त्यांच्या चौकशीतून रोहन जाधव याचे नाव निष्पन्न झाले होते. त्याने वापर केलेले बँक खात्यद्वारे झालेले फसवणुकीचे २९ गुन्हे एनसीआरपी तक्रारी उघडकीस आल्या आहेत. तसेच फरार आरोपीचे आंतरराष्ट्रीय हाँगकाँगच्या संशयित आरोपींशी संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने रोहन जाधव विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले होते. रोहन जाधव याचा शोध घेत असताना तपास पथकाने त्याचे विविध बँक व्यवहार, आर्थिक देवाण घेवाण आणि गुन्ह्यातील इतर आरोपींशी असलेले संबंध याबाबत पुरावे गोळा करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे रोहन जाधव याला अटक करण्यात आली आहे.

या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करुन लुटलेले १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपये सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या ५ हजार ४३६ बँकांमध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.

You may have missed