Pune Festival 2026 : पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक

Pune Festival 2026 | A glimpse of the spectacular cultural program at the opening ceremony of Pune Festival

Pune Festival 2026 : उद्घाटन सोहळा – दरवर्षी प्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळादेखील नेत्रदीपक झाला. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती झाली.

या उद्घाटन सोहळ्यात नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक बघायला मिळेल.

गणेश वंदना – उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ ज्येष्ठ नृत्यगुरु शर्वरी जेमिनीस यांच्या कथक नृत्यशैलीतून साकारला गेला. त्यांच्या शर्वरी जेमिनीस डान्स कंपनीच्या १० शिष्या सहकलावंत होत्या. ‘शेंदूर लाल चढायो’ या ज्येष्ठ गायक महेश काळे यांनी गायलेल्या प्रसिद्ध आरतीवर ही गणेशवंदना सादर झाली.

‘महाराष्ट्र सन्मान गीत’ – भारती विद्यापीठ डीम युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे ५० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सन्मान गीत सादर केले.

‘वसुधैवकुटुंबकम’- सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा नृत्याविष्कार सादर झाला. याचे दिग्दर्शन संचालिका अमृता रुईकर यांनी केले. यामध्ये १५ भारतीय आणि २० देशातील २३ परदेशी विद्यार्थी सहभागी झाले. त्यामध्ये युगांडा, झिम्बाब्वे, द गॅम्बिया, सौदी अरेबिया, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, संयुक्त अरब अमिराती (युएई), लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, माली, फिजी, नायजेरिया, दक्षिण सुदान, आयव्हरीकोस्ट,ब्राझील, जर्मनी, बेल्जियम,अर्जेंटिना या २० देशातील २३ परदेशी विद्यार्थी व १५ भारतीय विद्यार्थी सहभागी झाले. ‘वन वर्ल्ड – वन फॅमिली’ या सूत्रावर आधारित हे विद्यार्थी आपापल्या देशाच्या संस्कृतीचे संगीत व नृत्याविष्कारातून दर्शन घडवत होते.

‘चक दे इंडिया’- मागील वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाने भारतात झालेली जागतिक महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला. त्याच्या सन्मानार्थ ‘चक दे इंडिया’ हा नृत्याविष्कार सादर झाला. यामध्ये पेंटिंग,नृत्य, शंखवादन व नृत्याविष्कारामधून तिरंगा सादर केला गेला. महाराष्ट्राचा महिला क्रिकेट संघ यामध्ये सहभागी झाला. यावेळी ९ नृत्यांगना, १३ महिला शंख वादक, निवेदिता प्रतिष्ठान आकृती ग्रुपच्या १० महिला चित्रकार आणि महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमीच्या १२ महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या. यामध्ये शेवटी सर्व कलावंतांनी आपल्या कलाकृतीतून व शंखाच्या घोषात तिरंगा सादर केला.

‘झनक झनक पायल बाजे’- ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जन्मजयंती निमित्त ‘झनक झनक पायल बाजे’ हा त्यांच्या स्मृतींना श्रद्धासुमने अर्पण करणारा कार्यक्रम ‘पायल वृंद’ तर्फे सादर केला गेला. अभिनेत्री मानसी नाईक, भार्गवी चिरमुले व सहकलावंत यांचा यात सहभाग होता.

‘वंदे मातरम्’- वंदे मातरम’ या आपल्या राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. ज्येष्ठ कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या गीताने कोट्यावधी भारतीयांच्या मनात चैतन्य निर्माण होते. SNSS शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या नृत्यांगनांकडून या अमर गीतावर नृत्य सादरीकरण करुन मानवंदना अर्पण करण्यात आली. सर्व नृत्यांगनांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरुपात अमीरा पाटणकर नादरूप संस्था, अरुंधती पटवर्धन कलावर्धिनी डान्स कंपनी व रसिका गुमास्ते आकांक्षा ओडिसी नृत्यालय यांच्या तर्फे कथक, भरतनाट्यम् आणि ओडिसी या नृत्यशैलींचा सुंदर संगम या गीतावर सादर झाला. यात २४ नृत्यांगनांचा सहभाग असून ज्येष्ठ नृत्यगुरु क्षमा भाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

You may have missed