Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘कॉयर वीरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; भारतीय गाण्यांना पाश्चात्त्य हार्मनीची अनोखी जोड
पुणे : Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलअंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत ‘कॉयर वीरा’ या अनोख्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय संगीताच्या विविध प्रकारांवर आधारित जुन्या आणि नव्या गाण्यांना पाश्चात्त्य हार्मनीची सौंदर्यपूर्ण जोड देत वेगळ्या ढंगात सादर करण्यात आल्याने कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नव्या पिढीने भारतीय गाण्यांकडे पाहण्याचा हा वेगळा संगीतदृष्टिकोन प्रेक्षकांसाठी सुखद अनुभव ठरला. जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पिढ्यांतील रसिकांनी सादर झालेल्या गीतांना भरभरून दाद दिली. अनेक गाण्यांना ‘वन्स मोअर’ची मागणीही झाली.
कार्यक्रमात ‘चांदण्यात फिरताना’, ‘हवा के झोके’, ‘ये मोह मोह के धागे’, ‘आधा तेरा मेरा, आधा मेरा…’, ‘चंद्रमा’, गुजराती गरबा, ‘हाय रामा, ये क्या हुआ’ यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी कॉयर शैलीत सादर करण्यात आली.
या संगीत संचात प्रामुख्याने भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या समूहगायनातील सुसंवाद, हार्मनी आणि सादरीकरणाच्या वेगळेपणाला उपस्थितांनी विशेष दाद दिली.
भारती विद्यापीठाचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अनेकांनी या संकल्पनेचे आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्वस्त मोहन टिल्लू, समन्वयक श्रीकांत कांबळे आणि अतुल गोंजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी केले.
