Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये लावणीचा जल्लोष; घुंगरांचा छनछनाट आणि ढोलकीच्या तालावर रंगली मैफल
पुणे : Pune Festival 2026 | 38 व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित ‘लावणीचा खणखणाट आणि घुंगरांचा छनछनाट’ या बहारदार कार्यक्रमाने बालगंधर्व रंगमंदिर दुमदुमून गेले. सोमवार, 21 सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या या कार्यक्रमात ठसकेबाज लावण्या, नृत्यांगनांची दिलखेचक अदाकारी आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले यांना रसिकांनी शिट्ट्या, टाळ्या आणि ‘वन्स मोअर’च्या गजरात भरभरून दाद दिली.
गोल्डन गर्ल नमिता पाटील, लावणी क्वीन अर्चना जावळेकर, लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, नृत्यअप्सरा प्राची मुंबईकर, किरण पुणेकर, अस्मिता पुणेकर, नेहा मुंबईकर, पूजा बिडकर आणि संगीता लाखे यांच्यासह तब्बल 25 लावणी कलावंतांनी आपल्या अदाकारीने कार्यक्रमात रंग भरला.
गायिका स्वाती शिंदे यांच्या ठसकेबाज आवाजातील लावण्यांना रसिकांनी वारंवार ‘वन्स मोअर’ दिला. कार्यक्रमाला ढोलकीवर संदीप मस्के आणि आशिष गायकवाड, कीबोर्डवर अक्षय सकट, पॅड आणि रिदमवर सुशांत मस्के, गायनासाठी स्वप्निल गायकवाड यांनी साथ दिली. सोमनाथ फड यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
कार्यक्रमासाठी पुरुषांसह महिलांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गण, गवळण, मुजरा, पारंपरिक लावण्या आणि नव्या ढंगातील लावण्यांच्या सादरीकरणामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात ‘विचार काय हाय तुमचा’, ‘नाकी डोळी छान’, ‘राजस भेटला पैलवान’, ‘प्रीतीच्या झुल्यात झुलवा’, ‘लोणावळा खंडाळा’, ‘बाई गं कसं करमत नाही’, ‘चंद्रा’, ‘हिऱ्याची अंगठी’, ‘कैरी पाडाची’, ‘इश्काचा बाण सुटला’, ‘ह्या नटीन मारली मिठी’ आणि ‘तुम्हावर केली मर्जी बहाल’ यांसारख्या लोकप्रिय लावण्या सादर करण्यात आल्या. अनेक सादरीकरणांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत पुनःसादरीकरणाची मागणी केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्वस्त मोहन टिल्लू, बालगंधर्व येथील फेस्टिव्हल समन्वयक श्रीकांत कांबळे आणि अतुल गोंजारी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
ठसकेबाज नृत्य, पारंपरिक लावणीचा बाज, कलाकारांची अदाकारी आणि वाद्यवृंदाची दमदार साथ यामुळे हा कार्यक्रम रसिकांसाठी संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे संयोजन शशिकांत कोठावळे यांनी केले.
