Pune Ganeshotsav | पुणे : गणेशोत्सवात मंडळांमध्ये दुजाभाव नको; मानाच्या आणि लहान-मोठ्या सर्व मंडळांसाठी समान नियमांची मागणी

Pune Ganesh Festival | Pune: No favoritism among groups during Ganeshotsav; demand for same rules for both prestigious and small-large groups

पुणे : Pune Ganeshotsav | पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव काही मोजक्या प्रमुख मंडळांपुरता मर्यादित न राहता शहरातील सर्व गणेश मंडळांना समान नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या बैठकीत करण्यात आली.

खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन येथे ही बैठक पार पडली.

गणेश विसर्जन मिरवणूक निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. टिळक रस्त्यावरील मिरवणूक सातत्याने पुढे सरकत राहावी यासाठीचे नियोजन केवळ कागदावरच राहिल्याचा दावा करण्यात आला. लक्ष्मी रस्ता आणि इतर मिरवणूक मार्गांवरील मंडळांबाबतही भेदभाव केला जात असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

ध्वनिप्रदूषणाच्या कारवाईवरून मंडळांमध्ये नाराजी

2025 च्या गणेशोत्सवात सहभागी झालेल्या 300 हून अधिक मंडळांवर ध्वनिप्रदूषणाचे खटले दाखल करून नोटिसा बजावण्यात आल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

डीजे आणि साऊंड सिस्टीमप्रमाणेच ढोल-ताशा आणि इतर पारंपरिक वाद्यांनाही समान ध्वनीमर्यादा लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. केवळ डीजे वापरणाऱ्या मंडळांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

सर्व मंडळांसाठी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’

सर्व गणेश मंडळांनी गट-तट बाजूला ठेवून एकत्र यावे आणि उत्सवासाठी ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ निश्चित करावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

गणेश मंडळांवरील ध्वनिप्रदूषणाचे खटले बिनशर्त मागे घ्यावेत तसेच मानाच्या गणपतींपासून लहान-मोठ्या सर्व मंडळांसाठी मिरवणूक, ध्वनीमर्यादा आणि इतर नियम समान असावेत, या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

You may have missed