Pune Metro News | अखेर पुणेकरांची प्रतीक्षा संपणार? हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 3 नोव्हेंबरपासून धावण्याची शक्यता; PM मोदी करणार ऑनलाइन उद्घाटन!

Pune Metro News | Will Puneites' wait finally be over? Hinjewadi-Shivajinagar Metro likely to start running from November 3; PM Modi to do the online inauguration!

पुणे : Pune Metro News | अनेकदा उद्घाटन लांबणीवर पडलेल्या हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक ३ ची प्रवासी सेवा अखेर ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेट्रो मार्गिकेला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील दोन दिवसांत मेट्रोच्या उद्घाटनाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सोमवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि प्रकल्प कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मेट्रो मार्गिकेची सद्यस्थिती, उर्वरित कामे, प्रवासी सेवेसाठी आवश्यक सुविधा आणि उद्घाटनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या ३ नोव्हेंबर हीच संभाव्य तारीख कायम ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानचा हा २३ किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग असून, त्यावर एकूण २३ स्थानके आहेत. यापैकी १७ स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांपैकी स्थानक क्रमांक १३ आणि १४ ची कामे उद्घाटनापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात आलेली ही मेट्रो मार्गिका हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला शिवाजीनगर या पुण्यातील महत्त्वाच्या व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्राशी जोडणार आहे.

या मेट्रो सेवेमुळे हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांसह दररोज शहरात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच हिंजवडी–शिवाजीनगर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होऊ शकते.

दरम्यान, या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन यापूर्वी अनेकदा पुढे ढकलण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य पुणे दौऱ्यामुळे उद्घाटनाच्या तारखेबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, पीएमआरडीए आणि प्रकल्प कंपनीने तयारीचा आढावा घेतल्याने ३ नोव्हेंबरला मेट्रो सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मात्र, मेट्रोच्या उद्घाटनाची अंतिम तारीख आणि प्रत्यक्ष प्रवासी सेवा कधी सुरू होणार, हे अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.

You may have missed