Jalgaon Crime News | नियतीचा क्रूर घाला! मुलीच्या साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने अंत, आनंदावर विरजण!

Jalgaon Crime News | Cruel twist of fate! Just as preparations for the girl's engagement were underway, her parents pass away; electrocuted, joy turns into sorrow!

जळगाव : Jalgaon Crime News |  घरात मुलीच्या साखरपुड्याची लगबग सुरू होती… अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आनंदाच्या सोहळ्याची स्वप्ने रंगवली जात होती… मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेलेले आई-वडील पुन्हा घरी परतलेच नाहीत. शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने साखरपुड्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ही हृदयद्रावक घटना घडली. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरिता अशोक पाटील (वय ४३, दोघे रा. सुसरी) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

शेतात काम करताना काळाचा घाला!

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि त्यांच्या पत्नी सरिता पाटील हे सोमवारी सकाळी मजुरांसह आपल्या शेतात गेले होते. सुसरी शिवारातील गट क्रमांक १२८/१ मधील शेतात त्यांनी कांद्याचे पीक घेतले होते. पिकामध्ये वाढलेले गवत आणि तण काढण्याचे काम दोघेही करत होते.

याचदरम्यान, शेतातील विजेच्या खांबाची अर्थिंगची तार तुटून गवतात पडली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. या तारेच्या संपर्कात आल्याने अशोक पाटील यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

पतीला वाचवण्यासाठी धावल्या पत्नी; मात्र दोघांवरही काळाची झडप!

पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच सरिता पाटील त्यांच्या मदतीसाठी धावल्या. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

घटनेनंतर दोघांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विजेचा धक्का नेमका कोणत्या कारणामुळे बसला आणि दुर्घटना कशी घडली, हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

१ नोव्हेंबरला मुलीचा साखरपुडा; त्याआधीच आई-वडिलांचे छत्र हरपले!

या दुर्घटनेतील सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे अशोक पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी ठरला होता. घरात नव्या नात्याच्या स्वागताची तयारी सुरू होती. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आनंदाने साजरा करण्याची आई-वडिलांची इच्छा होती.

मात्र, त्या आनंदाच्या सोहळ्यापूर्वीच दोघांचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. ज्या घरात साखरपुड्याची लगबग सुरू होती, त्या घरात आता शोककळा पसरली आहे.

मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. आई-वडिलांचा एकाच वेळी आधार हरपल्याने तिन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुलीच्या साखरपुड्याचे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडिलांचा असा अचानक अंत झाल्याने सुसरी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You may have missed