Pune Pimpri Crime News | पुणे : दुर्दैवी ! गुन्हेगाराचा पाठलाग करताना पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! 2 चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले

Pune Pimpri Crime News | Pune: Unfortunate! Police officer dies of a heart attack while chasing a criminal! 2 little kids lose their father

पुणे / पिंपरी-चिंचवड : Pune Pimpri Crime News |  अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला असताना पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करताना पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली. रविवारी रात्री उशिरा अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईदरम्यान ही घटना घडली.

जावेद बागसिराज (वय ४०) असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थविरोधी पथकात (अँटी नार्कोटिक्स सेल) कार्यरत होते.

आरोपीचा पाठलाग करताना छातीत तीव्र वेदना अन् जागीच कोसळले!

रविवारी रात्री उशिरा संत तुकारामनगर परिसरात दोन जण एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती जावेद यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका संशयिताला पकडले. मात्र, त्याचा दुसरा साथीदार घटनास्थळावरून पळून जाऊ लागला. त्याला पकडण्यासाठी जावेद यांनी तातडीने पाठलाग सुरू केला.

धावत असतानाच अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते जमिनीवर कोसळले. हा प्रकार लक्षात येताच सहकारी पोलिसांनी त्यांना तातडीने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

१६ वर्षांची पोलिस सेवा; गुन्हे शाखेत बजावत होते कर्तव्य

जावेद बागसिराज हे २०१० मध्ये पुणे शहर पोलिस दलात भरती झाले होते. सुरुवातीची आठ वर्षे त्यांनी हडपसर आणि मुंढवा पोलिस ठाण्यांमध्ये सेवा बजावली.

२०१८ मध्ये पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर ते पिंपरी-चिंचवड पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात आणि पुढे गुन्हे शाखेत काम केले. सध्या ते अमली पदार्थविरोधी पथकात कार्यरत होते.

१२ वर्षांची मुलगी अन् सात वर्षांचा मुलगा पोरका!

जावेद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

कर्तव्य बजावत असताना जावेद यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पोलिस दलातही शोककळा पसरली आहे.

You may have missed