Pune News | बुकिंग केल्यानंतर सिलिंडर केव्हा मिळणार? पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणाले…

IAS Jitendra Dudi | District Collector Jitendra Dudi directs the meticulous management of available water reserves.

पुणे :   Pune News | गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या अफवा आणि तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून, पुरवठा सुरळीत आहे. मात्र, जे गॅस एजन्सी चालक किंवा मध्यस्थ जाणीवपूर्वक साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करत असतील, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाला अशा तक्रारी मिळाल्या होत्या की, काही भागांत ग्राहकांना सिलिंडर मिळण्यासाठी विलंब होत आहे किंवा जादा दराने विक्री केली जात आहे. यावर कडक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाची बैठक घेतली. गॅस कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, गॅस बुकिंग केल्यानंतर ठरलेल्या वेळेत डिलिव्हरी न देणाऱ्या किंवा ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या एजन्सींची गय केली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

साठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, गॅस गोदामांची अचानक तपासणी केली जाणार आहे. जर कुठेही काळाबाजार किंवा अनधिकृत साठा आढळला, तर संबंधित दोषींवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून थेट फौजदारी गुन्हे नोंदवले जातील. घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणाऱ्यांवरही या मोहिमेअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. ग्राहकांनी आपली फसवणूक होत असल्यास किंवा गॅस वेळेवर मिळत नसल्यास थेट जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे तक्रार करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरात घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून, वितरणही सुरळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू जाऊ नये, असे आवाहन गॅस कंपन्यांकडून केले आहे. घरगुती गॅसच्या नोंदणीसाठी (बुकिंग) आता ३० दिवसांचा कालावधी लागत आहे. तरी एका व्यक्तीने दोन सिलिंडरची नोंदणी केली असल्याने दुसरा सिलिंडर त्वरित मिळण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता असून, त्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागेल. परिणामी, नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असेही आवाहनही केले आहे.

You may have missed