Pune Pimpri Crime News | पोलीस मागावर असल्याचे पाहून थारचालकाने अनेक वाहनांना दिली धडक ! पोलिसांच्या वाहनांना दोनदा ठोकले, एक तासाच्या नाट्यानंतर गुन्हेगार जेरबंद
पुणे : Pune Pimpri Crime News | रायगड पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजल्यावर थार गाडी घेऊन गुन्हेगार सुसाट वेगाने निघाला. त्याने वाटेत आडव्या येणार्या वाहनांना ठोकले. फुटपाथवर गाडी घातली. इतकेच काय पोलिसांच्या वाहनाला दोनदा ठोकुन पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. १ तासाच्या पाठलागानंतर या गुन्हेगाराला पकडण्यात चाकण पोलिसांना यश आले.
सुखदेव हनुमंत नाईक Sukhdev Hanumant Naik (वय २९,रा. आरग ता. मिरज, जि. सांगली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. हा संपूर्ण प्रकार मोशीपासून सुरु होऊन वडगाव घेनंदपर्यंत भर दुपारी सुमारे १ तास सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड पोलीस गुन्हेगाराच्या मागावर मोशी परिसरात आले होते. २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुन्हेगाराचा शोध घेत होते. सुखदेव नाईक हा थार गाडीमध्ये बसला होता. त्याचा मित्र हॉटेलमध्ये बसला होता. नाईक याने रायगड पोलिसांची गाडी पाहिली. पोलिसांना पाहून त्याने थार गाडी सुसाट काढली. गुन्हेगार पळून जात असल्याचे पाहून पोलीसही त्याचा पाठलाग करु लागले. त्याने हॉटेलमधील मित्राला पोलीस पाठलाग करीत असल्याचे सांगितले. तेव्हा तो पळून गेला. नाईक याने थार गाडी मोशीहून चाकणकडे नेत होता. चाकण चौकातून त्याने थार गाडी शिक्रापूरकडे जाणार्या रोडवर घेतली.
तेथे पुढे जाणार्या अविनाश गोविंद मोरे (वय२०, रा. मेदनकरवाडी) यांच्या गाडीला धडक दिली. त्यांच्या तोंडाला किरकोळ दुखापत झाली. तोपर्यंत रायगड पोलिसांनी ११२ वर कॉल करुन गुन्हेगार हा थारमधून पळून जात असून आम्ही पाठलाग करतोय, असे कळविले. त्यादरम्यान, थार चालकाने गाडी वळवून रायगड पोलिसांच्या वाहनांना धडक देऊन तो पळून जाऊ लागला. याची माहिती मिळताच चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पोलीस व्हॅन घेऊन त्यांच्या मार्गावर थांबले. थारचालकाला अडविण्यासाठी वडगाव घेनंद येथे पोलीस व्हॅन आडवी लावली. थार चालकाने पोलिसांची गाडी पाहूनही तिला धडक दिली. ते पाहून तेथे थांबलेले पोलीस पळाले. पोलीस व्हॅनला गाडी धडकवुन त्याने थार वळवुन पुन्हा पोलिसांच्या अंगावर घातली. त्यात फिर्यादी पोलीस अंमलदार निरोज रज्जक शेख यांच्या हाताला दुखापत झाली. पोलीस व्हॅन चे नुकसान झाले. तरीही सहायक पोलीस निरीक्षक गणेश धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता सुकाळे व त्यांच्या सहकार्यांनी थारचालकाला गाडीसह ताब्यात घेतले.
सुखदेव नाईक याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. चाकण दक्षिण पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. त्याच्या मित्राचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्ता सुकाळे तपास करीत आहेत.
