Pune PMC News | रामटेकडी येथील कचर्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पात 8 वर्षात 1 युनिटही निर्मिती नाही; 750 टन क्षमतेच्या प्रकल्पाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांचींही ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’
मे. पुणे बायो एनर्जी कंपनीचे काम काढून घ्या – ॲड. निलेश निकम, विरोधी पक्षनेता, महापालिका
पुणे : Pune PMC News | रामटेकडी येथे कचर्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाला २०१८ मध्ये वर्क ऑर्डर दिल्यानंतरही अद्याप तेथे एक युनिटही वीज निर्मिती होउ शकलेली नाही. दररोज तब्बल ७५० टन कचरा प्रक्रियेस मान्यता देणारी सत्ताधारी भाजप आणि कचर्याच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे विरोधकही या प्रकल्पाबाबत तोंडात मिठाची गुळणी धरून बसल्याने ‘घोटाळ्याचा’ संशय येउ लागला आहे.
शहरात गोळा होणार्या सुक्या कचर्यापासून वीज निमिॅती करण्यासाठीच्या प्रकल्पाला २० फेब्रु्रवारी २०१८ मध्ये स्थायी समितीने मंजुरी दिली. हे काम मे. पुणे बायो एनर्जी सिस्टिम प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले. दररोज ७५० कचर्यापासून १३. ५ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार होती. यासाठी ठेकेदाराला ६६९ रुपये प्रति मेट्रीक टन टिपिंग फी देण्यात येणार आणि दरवर्षी या फीमध्ये ५ टक्के वाढ होईल, असेही प्रस्तावात नमूद आहे. २९ जून २०१८ ला या कंपनीसोबत महापालिकेने करार केला आहे. करारानुसार प्रकल्प उभारणी आणि प्रत्यक्षात वीजनिर्मिती २०२२ मध्ये करणे अपेक्षित होते. करारानुसार महापालिकेने प्रकल्प उभारण्यासाठी आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपये ठेकेदाराला दिले आहेत.
या पाठोपाठ या प्रकल्पातून वीज खरेदीबाबत महापालिका, पुणे बायो एनर्जी सिस्टिम प्रा.लि. आणि मे. महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण मंडळाचा १२ ऑगस्ट २०२२ मध्ये वीज खरेदीसाठीचा संयुक्त करारनामा देखिल झाला आहे. वीज निर्मिती सुरूझाल्यानंतर १३. ५ मेगावॅट पैकी ११. ५ मेगावॅट वीज ही नेट मिटरींगद्वारे राज्य वीज मंडळाला पुरवून उर्वरीत २ मेगावॅट वीज ही प्रकल्पा चालविण्यासाठी वापरण्यात येणार होती.
परंतू मे २०२६ हे वर्ष उजाडले असून अद्याप या प्रकल्पातून एक युनिटही वीज निर्मिती झालेली नाही. किंबहुना या प्रकल्पामध्ये मे २०२१ पासून सुक्या कचर्यापासून केवळ आरडीएफ तयार करून ते सिमेंट कंपन्यांना देण्यात येत आहे. महापालिका शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत असताना अशा आतबट्टयाच्या आणि अन्यत्र सक्सेसफुल ठरलेल्या योजना राबवित नाही. याउलट असे ठेकेदारांना पोसणार्या आणि त्यातून केवळ भ्रष्टाचार करणार्या मंडळींना पोसत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
सुदैवाने पालिकेत चार वर्षांच्या प्रशासकराज नंतर पुन्हा भाजपचीच सत्ता आली आहे. परंतू भाजपच्या नेतृत्वावाला कचरा व्यवस्थापन योग्य होते की नाही? प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या सुरू आहेत की नाही? प्रकल्पांपुढे कोणत्या अडचणी आहेत ? याबाबत कसलेही देणे घेणे नाही. केवळ नव्याने प्रकल्प आणि टेंडर प्रक्रिया यामध्येच इंटरेस्ट असल्याचे आतापर्यंतच्या तीन महिन्यांत दिसून आले आहे. विरोधकांनाही या टेंडर प्रक्रिये व्यतिरिक्त यापुर्वी चालू असलेल्या प्रकल्पांबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येते.
मे. पुणे बायो एनर्जी प्रकल्प बंद करा
तब्बल ८ वर्षे उलटूनही पुणे बायो एनर्जी प्रकल्पातून एक युनिटही वीज निर्मिती झालेली नाही. ७५० मे.टनच्या प्रकल्पाला मान्यता असताना जेमतेम १४० ते १६० मे.टन कचर्यावर प्रक्रिया होत आहे. थोडक्यात हा प्रकल्प चालविण्यात पुणे बायो एनर्जी कंपनी अपयशी ठरल्यावर शिक्कामोर्तब होत आहे. या कंपनीला दिलेली दहा एकर जागा आणि तब्बल ६० कोटी रुपये दिले आहेत. महापालिकेने ही जागा ताब्यात घ्यावी. या कंपनीचे काम काढून घेउन दुसर्या कंपनीला काम देण्यात यावे. या कंपनीशी करार करताना अधिकार्यांनी महापालिकेचे नुकसान केले आहे. त्यांच्या पगारातून नुकसान भरपाई वसुल करावी.
– ॲड. निलेश निकम, विरोधी पक्षनेता, पुणे महापालिका.
कंपनीबाबत विचार करणार
मे. पूना बायो एनर्जी कंपनीने २०२२ मध्ये पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू करणे अपेक्षित होते. परंतू प्रकल्प उभारणीसाठी कंपनीला कर्ज पुरवठा होण्यास विलंब झाल्याने प्रकल्पातून अद्याप वीजनिर्मिती होउ शकलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. माझ्याकडे घन कचरा विभागाचा नुकतेच पदभार आला आहे. कंपनीसोबत केलेल्या कराराची माहीती घेउन योग्य ती ुङ्गकारवाई करण्यात येईल. – प्रसाद काटकर, उपायुक्त, घनकचरा विभाग (प्रकल्प)
देवाची उरूळी फुरसुंगी कचरा डेपोमध्ये कचरा डंपिंग!
पुणे शहरातील झोन १ मधील कचर्यापासून आरडीएफ तयार करणार्या दोन प्रकल्प क्षमता वाढीच्या कामामुळे मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद आहेत. या प्रकल्पांकडे पाठविण्यात येणारा कचरा सध्या फुरसुंगी येथील डेपोमध्ये साठविण्यात येत आहे. आजमितीला सुमारे ७ ते ८ हजार मे.टन कचरा येथे साठविण्यात आला आहे. हा ओला आणि सुका असा मिक्स कचरा असल्याने येत्या पावसाळ्यात फुरसुंगी येथे पुन्हा प्रदुषणाची समस्या निर्माण होउ शकते. स्थानीक नागरिकांनी आतापासूनच याबाबत तक्रारी सुरू केल्या आहेत. बायो एनर्जी प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरू असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. केवळ कचरा वाहून न्यायची निविदा काढण्यासाठी प्रशासनही या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.
