Pune PMC News | पुणे : खोदाई शुल्काचे 100 कोटी आले, तरी पुणे खड्ड्यात का? महापालिकेला सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
पुणे : Pune PMC News | शहरातील रस्ते खोदण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून पुणे महापालिकेला गेल्या दोन वर्षांत सुमारे ₹100 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, एवढी रक्कम मिळूनही पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य का आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील विविध भागांत महावितरण, एमएनजीएल तसेच इतर संस्थांकडून सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले जातात. त्यासाठी संबंधित संस्थांना महापालिकेकडून शुल्क भरून परवानगी घ्यावी लागते.
रस्ता खोदल्यानंतर तो योग्य पद्धतीने पूर्ववत करण्याचे बंधन संबंधित संस्थांवर असते. मात्र, शास्त्रीय आणि तांत्रिक पद्धतीने रस्ता पूर्ववत करण्याची क्षमता संबंधितांकडे नसल्याने ही जबाबदारी अनेकदा महापालिका पार पाडते. त्यासाठी संबंधित संस्थांकडून शुल्क आकारले जाते.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, या शुल्कापोटी गेल्या दोन वर्षांत महापालिकेला सुमारे ₹100 कोटी मिळाले आहेत.
खोदलेले रस्ते इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार पूर्ववत करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, या मानकांकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाची दुरुस्ती केली जात असल्याने काही दिवसांतच रस्त्याचा भाग पुन्हा उखडतो आणि त्याठिकाणी खड्डे पडतात, असा आरोप वेलणकर यांनी केला आहे.
वाहनांची मोठी वर्दळ असल्याने हे खड्डे आणखी वाढतात. विशेषतः पावसाळ्यात याचा पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
यापुढे खोदलेल्या रस्त्यांची शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती न झाल्यास किंवा दुरुस्त केलेल्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्यास संबंधित कंत्राटदारांसह कामावर देखरेख करणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही वैयक्तिकरीत्या जबाबदार धरावे, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
