Pune Metro News | गणेशोत्सवात पुणे मेट्रो मध्यरात्रीनंतरही धावणार; अनंत चतुर्दशीला सलग 41 तास सेवा

Pune Metro

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या वेळेत वाढ; मंडई स्थानकावरील गर्दी टाळण्याचे आवाहन

पुणे : Pune Metro News | गणेशोत्सवाच्या काळात शहरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये आणि सेवाकाळात वाढ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी 25 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सलग 41 तास सुरू राहणार आहे.

मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 11 या नियमित वेळेत सुरू राहील.

त्यानंतर 17 ते 24 सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 6 वाजता सुरू झालेली मेट्रो सेवा 26 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजेपर्यंत अखंड सुरू राहणार आहे. अशा प्रकारे मेट्रो सलग 41 तास सेवा देणार आहे.

27 सप्टेंबरपासून मेट्रो पुन्हा सकाळी 6 ते रात्री 11 या नियमित वेळेत सुरू राहील.

दरम्यान, भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांनी गर्दीच्या वेळेत महात्मा फुले मंडई स्थानकावर उतरणे टाळावे आणि शक्य असल्यास जवळच्या इतर मेट्रो स्थानकांचा वापर करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक शहरात येतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने ही विशेष व्यवस्था केली आहे.

You may have missed