Pune PMC News | भाजपच्या काही नगरसेवकांना गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल अनास्था; 19 वर्षे दर्जेदार शिक्षण देणार्‍या आकांक्षा फौंडेशनला निधी देण्याचा प्रस्ताव फेटाळला

Pune PMC News | Some BJP corporators show apathy towards the education of underprivileged children; proposal to fund the Akanksha Foundation which has been providing quality education for 19 years rejected.

वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी कान उघडणी करत येत्या बैठकीत प्रस्ताव मंजुर करण्याचे आदेश दिले

पुणे :  Pune PMC News |  तब्बल गेली १९ वर्षे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून गुणवत्तापूर्वक शिक्षण देणार्‍या आकांक्षा फौंडेशनला हटविण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील एक मोठा गट कार्यरत असल्याचे समोर आले आहे. सीएसआर फंडामध्ये कमतरता भासू लागल्याने प्रत्येक विद्यार्थ्यामागे शिक्षक व अन्य स्टाफच्या वेतनासाठी २५ हजार रुपये निधीची मागणी केल्याचा प्रस्तावाचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव शिक्षण  समिती  आणि स्थायी समितीतील भाजपच्याच सदस्यांनी स्थायी समितीपुढे मांडला आणि मंजुरही करून घेतला. यावरून सत्ताधारी भाजपची गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीची आस्था समोर आली आहे.

आकांक्षा फौंडेशनच्यावतीने २००७ पासून महापालिकेच्या विविध भागातील ५ इंग्रजी शाळांमध्ये  शिक्षण देण्यात येते. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेष व शालेय साहित्यासाठी डीबीटीद्वारे पैसे उपलब्ध करून देण्यात येतात. त्याच पद्धतीने आकांक्षा फौडेशनच्यावतीने चालविण्यात येणार्‍या विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे पैसे दिले जातात.  आकांक्षा फौंडेशन केवळ त्यांनी नेमलेले ६६५ शिक्षक आणि त्यांना आवश्यक असलेल्या स्टाफचे वेतन देते. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यामागे शिक्षक व स्टाफचा खर्च ३८ हजार रुपये आहे. त्या ठिकाणी आकांक्षा फौडेशन तब्बल ५५ हजार रुपये खर्च करते. फौंडेशनने प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अगदी कला व तांत्रिक शिक्षकांचाही समावेश आहे.

गेली १७ वर्षे आकांक्षा फाउंडेशनच्यावतीने अव्याहतपणे हा उपक्रम सुरू आहे. मात्र, अलिकडे सीएसआरच्या माध्यमातून  मिळणारा निधी कमी पडत असल्याने महापालिकेने प्रत्येक विद्यार्थ्यामागे २५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार महापालिकेला प्रत्येक वर्षी ११ कोटी असे दहा वर्षांसाठी  ११० कोटी रुपये खर्च येणार आहे. ही रक्कम ७२ ब नुसार उपलब्ध करून द्यावी, असा ठराव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला.

महापालिका शाळांशी निगडीत विषय असल्याने हा प्रस्ताव शिक्षण समितीपुढे ठेवावा, यावरून बुधवारी शिक्षण समितीच्या बैठकीत बरीच खडाजंगी झाली. अखेर शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे आणि उपाध्यक्ष अतुल तरवडे यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करावा आणि तो शिक्षण समितीच्या माध्यमातून आणावा असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला. या प्रस्तावावर शिक्षण समितीमधील भाजप सदस्या निवेदीता एकबोटे, कुणाल टिळक, वृषाली रिठे, कोमल नवले यांच्यासह स्थायी समिती सदस्य डॉ. दादा कोद्रे यांनी देखिल स्वाक्षरी केली आहे. मुळातच प्रस्ताव मान्य झालेला नसताना फेरविचार देण्यात आला. एवढेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्षांनी देखिल तो मान्य करत कार्यतत्परता दाखविल्याने भाजपच्या सदस्यांचे गरिब मुलांच्या शिक्षणाविषयीची अनास्था समोर आली.

यासंदर्भात माहिती देताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, की आकांक्षा फौंडेशनकडे मागील १९ वर्षातील शैक्षणिक प्रगतीबाबत अहवाल मागितला आहे.  सदस्यांना त्याचे प्रेझेंटेशन देण्यास सांगितले आहे. प्रेझेंटेशननंतर प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. सभागृह नेते गणेश बीडकर यांनी या प्रस्तावावरून पक्षातील नगरसेवकांचे चांगलेच कान टोचले. या संस्थेच्यावतीने चालविण्यात येणार्‍या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली असून  दहावीचा निकाल ९९ टक्क्यांच्या आसपास असतो. या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणाचा रेशो देखिल अत्यंत चांगला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालक उत्सुक असतात. नव्याने निवडूण आलेल्या नगरसेवकांना याबाबत माहिती नसल्याने गैरसमजुतीने या विषयावर ते व्यक्त झाले. परंतू येत्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल.

आकांक्षा फौंडेशन मार्फत चालविण्यात येणार्‍या शाळा

सोमवार पेठ, भवानी पेठ, बोपोडी, येरवडा आणि कोरेगाव पार्क येथील महापालिकेच्या पाच शाळांचा यामध्ये समावेश आहे. याठिकाणी ४ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात.

You may have missed