Pune ACB Trap Case | बांधकाम पाडायची भिती दाखवून लाच घेणार्या वॉर्ड निरीक्षक अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
पुणे : Pune ACB Trap Case | उच्च न्यायालयाने बांधकाम दंड भरून नियमित करायला सांगितले असताना बांधकाम पाडण्याची भिती दाखवुन ७० हजार रुपयांची लाच घेताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड प्रभागातील वॉर्ड निरीक्षक अभियंता याला रंगेहाथ पकडण्यात आले. (Pimpri Bribe Case)
उमेश अरुण लोंढे Umesh Arun Londhe (वय २८, रा. शिवराजनगर, रहाटणी) असे या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. तो सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्त्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर कार्यरत होता. उमेश लोंढे याने बी ई सिव्हिलचे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे त्याला पागे समितीच्या माध्यमातून अनुकंपा तत्वावर ३ महिन्यापूर्वीच रुजू करुन घेतले होते.
तक्रारदार यांची पिंपळे गुरव येथे एक गुंठा जागा आहे. या जागेवर त्यांनी तीन मजली बांधकाम केले आहे. त्याची त्यांनी महापालिकेची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे हे बांधकाम अनाधिकृत असल्याचे दर्शवून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून २५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदारांना नोटीस देण्यात आली. या नोटीस विरोधात तक्रारदार यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने तक्रारदार यांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडे जाऊन नियमानुसार दंड भरुन त्यांनी केलेले बांधकाम नियमित करुन घेण्याबाबत आदेश दिला होता. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत बांधकाम नियमित करण्याबाबतचा अर्ज दाखल केला होता. उमेश लोंढे हा पिंपळे गुरव वॉर्ड अतिक्रमण विरोधी विभागाचा बीट निरीक्षक आहे.
उमेश लोंढे याने ८ जून रोजी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना भेटायला बोलविले. त्यांनी केलेल्या बांधकामाबद्दल तक्रारी असून ते अनाधिकृत असलयाने पाडावे लागेल, असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत दाखवली. परंतु, तो निकाल दुर्लक्षित करुन कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ९ जून रोजी मिळाली. त्याची पडताळणी ११ जून रोजी करण्यात आली. त्यात उमेश लोंढे याने ७० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून ७० हजार रुपये स्वीकारताना उमेश लोंढे याला पकडण्यात आले. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके व त्यांचे सहकारी यांनी केली़ पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करीत आहेत.
