Pune Crime News | मुंढवा पोलिसांच्या तपास पथकाची हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धडाक्याची कारवाई !

Pune Crime News | Mundhwa Police in Hadapsar Police Station; Five call centers, operational for four and a half months, were shut down; they were defrauding 300 to 400 people daily through online gaming.

साडे चार महिने सुरु असलेले 5 ठिकाणचे कॉल सेंटर केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंगमधून दररोज 300 ते 400 जणांची करत होते फसवणूक

पुणे : मुंढवा पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तब्बल १५ दिवस तपास करुन हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरात धडाडीची कारवाई करुन ५ ठिकाणावर  छापे घातले  तेथील ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून चालणारे फसवणूकीचे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे.

या ठिकाणाहून बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवुन लोकांना ऑनलाईन गेम खेळण्यास भाग पाडून त्यासाठी त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास लावून त्यांची फसवणूक करत होते. प्राथमिक माहितीनुसार, या कॉल सेंटरवरुन दररोज ३०० ते ४०० जणांची ३० ते ४० लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे तपासामध्ये पुढे आले आहे.   हे सर्व  कॉल सेंटर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.  यातील दोघा प्रमुख सुत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मध्यरात्री प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.  

संतोष दत्ता वेंजणेकर Santosh Datta Venjanekar (वय ४७, रा. पार्क इन्फिनिया सोसायटी, भेकराईनगर, मुळ रा. वेजणे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के Vinayak, alias Deepak Manohar Ikke (वय ४०, रा. सिल्व्हर वुड सोसायटी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.

त्यांचा  प्रमुख साथीदार अमित मजेटिया (Amit Majetia) हा दुबई येथे असून भागिरथ पांड्या (Bhagirath Pandya) हा त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

निदा आरीफ अन्सारी Nida Arif Ansari (वय २१, रा. अपोलो हॉस्पीटल जवळ, गोपाळपट्टी मांजरी), पुनम अनंत भालके Poonam Anant Bhalke (वय २५, रा. लेन नं-१३, भेकराईनगर, तुकाई दर्शन हडपसर), अनुजा शरद जाधव Anuja Sharad Jadhav (वय २५, रा. गायकवाड हॉस्पीटल जवळ, केशवनगर मुंढवा), रविंद्र कृष्णा कुरळे Ravindra Krishna Kurale (वय ४०, रा़ सर्वे नंबर-२०९, भागीरथी नगर, साधूनाना तुपे वस्ती, हडपसर), अक्षय झिबु पाटील Akshay Zibu Patil (वय २५, रा. थिटेवस्ती), विवेक विलास जाधव Vivek Vilas Jadhav(वय ३०, रा अर्जुन कॉम्पलेक्स फुरसुंगी रोड, भेकराईनगर, हडपसर),

प्रांजल अनिल मिश्रा Pranjal Anil Mishra (वय २३, रा. औदुबर कॉलनी, काळेपडळ), सागर कैलास उसरे Sagar Kailas Usre (वय ३०, रा.पापडे वस्ती फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण कॉल सेंटरमध्ये कामाला होते. ही कारवाई अमनोरा चेंबर्स, अमनोरा मॉल, भेकराईनगरमधील अ‍ॅपेक्स अ‍ॅचीव्हर व जे के एल इंडिया सोल्युशन यांच्या ५ ठिकाणावर १० जून रोजी दुपारी ४ वाजता सुरु झाली. सलग १७ तास पंचनामा व इतर बाबी पूर्ण करण्यात आल्यानंतर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज राजेंद्र पोमम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनोरा चेंबर्स येथे बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालविले जात असून तेथून लोकांना ऑनलाईन गेमिंग खेळायला लावून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडून फसवणूक केली जात असल्याची माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली. या ऑनलाईन गेमिंग मध्ये फसल्या गेलेल्या तरुणांकडूनही मुंढवा पोलिसांना याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी या कॉल सेंटरची माहिती काढून सायबर पोलीस आणि हडपसर पोलीस यांच्या मदतीने या ठिकाणी छापे घातले. या कॉल सेंटरमध्ये संतोष वेंजणेकर याने तरुणांना कामाला ठेवून त्यांच्याकडून पॅन कार्ड व आधार कार्ड घेऊन त्यांच्यामध्ये फेरफार करुन सीम कार्ड घेऊन व बनावट बँक खाती उघडून त्याचा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता वापर केला.

बेकायदा पिस्टल जप्त

या ठिकाणी पोलीस छापा कारवाई करत असताना संतोष वेंजणेकर याच्याकडे पिस्टल व ६ जिवंत काडतुसे सापडली आहे. त्याचबरोबर त्याने या कॉल सेंटरमध्ये ५ अल्पवयीन मुले, मुली यांना कामास ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर काम जबरदस्तीने करुन घेऊन त्यांचे शोषण केले आहे.

या कॉल सेंटरमधून नागरिकांना कॉल करुन त्यांना कंपनीचे वेबसाईटद्वारे गेमिंग खेळण्यास सांगून त्यांचा अगोदर विश्वास संपादन करत. त्यानंतर नागरिकांना ऑनलाईन गेमिंग खेळण्याकरीता पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत. सुरुवातीला नागरिक काही गेम जिंकतात. त्यानंतर पुढे ते सतत गेम हारत जातात. त्यांना तुमचे पैसे परत मिळण्याची संधी आहे, असे सांगून आणखी पैसे ट्रान्सफर करायला लावले जात होते.

यातील प्रमुख सुत्रधार संतोष वेंजणेकर आणि विनायक इक्के आहेत. अमित मजेटिया हा दुबईला असून तो या सर्वांना मदत करत होता. भागिरथ पांड्या हा या सर्वांचे आर्थिक व्यवहार पहात असे. आलेले पैसे कोठे, कसे ट्रान्सफर करायचे हे काम तो पहात असे. या दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

या ५ ठिकाणाहून हार्ड डिस्क, एसएसडी, अ‍ॅटो डायलर मशीन, सीम कार्ड, सर्व्हररुम मधील हार्ड डिस्क, कागदपत्रांच्या फाईल्स, कंपनीच्या नावाचे शिक्के, विविध बँक खात्याचे चेक बुक, पासबुक, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, सीसीटीव्ही डिव्हीआर, ग्राहक संभाषण स्क्रिप्ट, सीम बॉक्स, सोन्याचांदी चे दागिने, रोख रक्कम, वेगवेगळ्या बँकांची डेबीट कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड मोबाईल फोन तसेच एक पिस्टल व ६ जिवंत काडतुसे असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई जवळपास १७ तास सुरु होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली. त्यातील इतर १० कामगारांना नोटीस देण्यात आली. अटक केलेले दोघे जण अनेक तास पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना २४ तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक होते. त्यासाठी मध्यरात्री साडेबारा वाजता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर त्यांना हजर करण्यात आले. त्यांची २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.

You may have missed