Pune PMC News | स्वच्छतागृह देखभाल-दुरुस्तीसाठी दीर्घकालीन प्रस्ताव सादर करा – यी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले
पुणे : Pune PMC News | शहरातील बंद असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे तातडीने दुरुस्त करून आगामी गणेशोत्सवापूर्वी नागरिकांसाठी खुली करावीत. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित आणि दर्जेदार देखभाल होण्यासाठी किमान दोन वर्षांचा सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्ती प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
भिमाले म्हणाले, पुणे महापालिकेकडून शहरात ‘स्मार्ट टॉयलेट’ आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच अस्तित्वातील काही सार्वजनिक स्वच्छतागृहे बंद असल्याची बाब समोर आली आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सुमारे सात हजार टॉयलेट सीट्स उपलब्ध आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा, वीज, दरवाजे, नळ तसेच अन्य आवश्यक सुविधांची दुरुस्ती वेळेत होत नसल्याने स्वच्छतागृहे वापरासाठी बंद राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले.”
सणासुदीचे दिवस तसेच आगामी गणेशोत्सवात शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची व भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे बंद स्वच्छतागृहांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय यादी तयार करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. स्वच्छता, पाणी व वीजपुरवठा नियमित राहील याचीही व्यवस्था करावी, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.
‘‘सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. गणेशोत्सवापूर्वी बंद स्वच्छतागृहे दुरुस्त करून सुरू करावीत. भविष्यात स्वच्छतागृहे बंद राहू नयेत, यासाठी किमान दोन वर्षांचा देखभाल-दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करावा.’’
– श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
