Share Market Crash | इराण-इस्रायल संघर्षाचा भडका; भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 800 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला

share market

नवी दिल्ली :  Share Market Crash | मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय शेअर बाजाराला आज मोठा धक्का बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ८२१ अंकांनी कोसळून ७३,४२१ अंकांवर आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी ५०’ २८६ अंकांनी घसरून २३,०८० पातळीवर पोहोचला.

इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधी धोक्यात आली असून, युद्ध अधिक तीव्र होण्याच्या भीतीने जागतिक बाजारात घबराट पसरली आहे. आशियाई बाजारात जपानचा निक्केई ४.६ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा कोस्पी तब्बल ७ टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले, ज्याचे थेट सावट भारतीय बाजारावरही उमटले.

या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) किमतीत ३ टक्क्यांहून अधिक मोठी उसळी आली असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ९६.०५ डॉलर्सवर पोहोचले आहे. भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार देश असल्याने या दरवाढीमुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. या तणावाचा थेट फटका भारतीय चलनालाही बसला असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३४ पैशांनी कमजोर होत ९५.३२ रुपयांवर खुला झाला आहे.

जागतिक अस्थिरतेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून सावध भूमिका घेत पैसे काढण्यास सुरुवात केल्याने ही घसरण झाली असून, आगामी काळात युद्धाची परिस्थिती कशी राहते यावरच बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

You may have missed