Pune Police News | पुणे : गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा ओलांडल्यास कडक कारवाई; बेताल वक्तव्यांवर थेट गुन्हे दाखल होणार, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा
पुणे: Pune Police News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर तसेच समाजमाध्यमांवरून जातीय तेढ निर्माण करणारी किंवा कायद्याचे उल्लंघन करणारी वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, कायद्याचे उल्लंघन करणारी, सामाजिक सलोखा बिघडवणारी किंवा कायद्यानुसार गुन्हा ठरणारी वक्तव्ये आढळल्यास संबंधितांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात येईल.
कसबा पेठेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पायी पाहणी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी कसबा पेठ परिसरात पायी पाहणी दौरा केला.
या पाहणीदरम्यान रस्त्यांची अवस्था, खड्डे, संभाव्य वाहतूक कोंडी आणि गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होऊ शकणाऱ्या इतर अडचणींचा आढावा घेण्यात आला.
रस्त्यावर अतिक्रमण दिसताच संबंधित दुकानदारांना समज देण्यात आली. तसेच फरासखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी स्वतः रस्त्यावर फिरून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले.
पुढील दोन ते तीन दिवसांत गणेश मंडळांच्या प्रमुख अडचणी तसेच रस्त्यांशी संबंधित समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
ध्वनी व्यवस्थेवर कडक निर्बंध
गणेशोत्सवातील ध्वनिव्यवस्थेबाबत बोलताना पोलीस आयुक्तांनी सांगितले की, 22 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत गणेश मंडळांनी निर्धारित ध्वनिमर्यादा पाळण्याचे मान्य केले आहे.
उत्सवादरम्यान केवळ ‘4 बेस आणि 4 टॉप’ ध्वनिव्यवस्थेला परवानगी राहणार असून, प्लाझ्मा आणि प्रेशर मिड वापरण्यास पूर्णपणे मनाई असेल.
दहीहंडी उत्सवाप्रमाणेच गणेशोत्सवातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला.
मध्यवर्ती पुण्यात जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या मध्यवर्ती भागात जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि विसर्जन मिरवणुका लक्षात घेऊन वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
समाजमाध्यमांवर पोलिसांची विशेष नजर
गणेशोत्सवादरम्यान समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह मजकुरावर पुणे पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये आणि सार्वजनिक वक्तव्य करताना कायदा व नियमांच्या चौकटीत राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
एखाद्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण झाली किंवा कायद्यानुसार गुन्हा घडत असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिक आणि गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
