Pune Rural Crime News | 12 वी पास गिरी करत होता गर्भलिंग निदान चाचणी; वाघोलीतील गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग, शेकडो जणांच्या चाचण्या केल्याचे उघड
पुणे : अण्णासाहेब गिरी हा १२ वी पास असुन त्याने बी फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र ते शिक्षण पूर्ण केले नाही. आयुर्वेदिक डॉक्टरसाठी एम आर काम केल्याच्या जोरावर त्याने अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी करण्यास सुरुवात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो गावोगावी जाऊन महिलांची गर्भलिंग निदानाची चाचणी करत होता. त्यासाठी प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपये फी घेत होता. धक्कादायक बाब म्हणजे वाघोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पोर्टेबल मशीन जप्त केले आहे. दोघांना अटक केली असून इतर तिघा आरोपींचा शोध सुरु आहे.
जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणार्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलीसांनी पर्दाफाश केला असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे, असे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.
यातील प्रमुख आरोपी आण्णासाहेब गिरी Annasaheb Giri Kedgaon (रा. केडगाव, ता. दौंड, मूळ रा. पारनेर, जि. नगर) याला २० मे रोजी अटक केली आहे. तर डॉ. अतुल अंकुश जाधव Dr. Atul Ankush Jadhav (रा. लोहगाव), नरेंद्र साहेबराव ठाकरे Narendra Sahebrao Thackeray (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार सुरेश माळी Mandar Suresh Mali (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम Sundaram Kadam Uruli Kanchan (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. सचिन गुजर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना १७ मे रोजी एकाने महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओच्या आधारे १९ मे यवत पोलीस ठाण्यात त्यांनी स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी अण्णासाहेब गिरी याने नरेंद्र ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशीन घेतल्याचे निष्पन्न झाले.
यातील आरोपी नरेंद्र ठाकरे हा वाघोलीमध्ये या वर्षीच्या सुरुवातीला दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मंदार माळी व सुंदरम कदम यांचा शोध घेतला जात आहे.
कायद्याने प्रतिबंध असलेल्या गर्भलिंगनिदान चाचणी करत आरोपींनी पैशांसाठी हे सगळे षड्यंत्र असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मागील पाच वर्षात शेकडो महिलांची आरोपीने तपासणी केली आहे, असे संदिप सिंग गिल यांनी सांगितले.
या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदिप सिंग गिल , अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देशमुख व त्यांचे सहकारी यांनी केली आहे.
