Pune Hinjewadi Crime News | फ्रेशर्सना नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; ‘थिंकटेक इंडिया’च्या सीईओला अटक
पुणे : Pune Hinjewadi Crime News | फ्रेशर्सना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘थिंकटेक इंडिया ओपीसी लिमिटेड’ कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भानुदास ठाकरे (Harshal Bhanudas Thackeray) याला हिंजवडी पोलिसांनी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी सौरव राजन नायर (वय २५, रा. देहूरोड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हर्षल भानुदास ठाकरे (Harshal Bhanudas Thackeray), ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रमुख ध्रुविल पारेख, एचआर अधिकारी सौम्या सिंग तसेच थिनटेक टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीतील (Thintech Technology Pvt. Ltd. Company) इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे याने मोठ्या संख्येने फ्रेशर्सना नोकरीच्या संधीचे आमिष दाखवत कंपनीत घेतले होते. मात्र, कंपनीने यावर्षी एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कामकाज बंद केले. कंपनी अचानक बंद झाल्यानंतर तसेच व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर पोलिसांच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथून हर्षल ठाकरे याला ताब्यात घेतले. या प्रकरणात कंपनीच्या एचआर प्रमुख आणि प्रशिक्षण प्रमुखाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
६०० ते ७०० कर्मचाऱ्यांना गंडा घातल्याचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हर्षल ठाकरे याने मनुष्यबळ विभागप्रमुख आणि प्रशिक्षण प्रमुखासोबत संगनमत करून कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १५ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. या माध्यमातून कंपनीतील सुमारे ६०० ते ७०० कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी होणार
या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा माग काढण्यासाठी आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.
यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक निरीक्षक संदीप वांगणेकर आणि सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत हर्षल ठाकरे याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
