Sant tukaram maharaj palkhi | संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; 7 जुलै रोजी देहूतून पंढरीसाठी प्रस्थान
पुणे : Sant tukaram maharaj palkhi | लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू येथून निघणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा ७ जुलै २०२६ रोजी दुपारी दोन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. देहूतील मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इनामदार वाडा येथे विसावा घेतल्यानंतर, ९ जुलै रोजी हा पालखी सोहळा पुणे शहरात दाखल होईल.
पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार असून, येत्या २३ जुलै रोजी हा सोहळा पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी पोहोचेल. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
यंदाच्या आषाढी वारीच्या प्रवासात पालखीचे विविध ठिकाणी मुक्काम आणि गोल रिंगण होणार आहेत. पालखी सोहळा पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड आणि बारामतीमार्गे पुढे प्रवास करेल. प्रवासादरम्यान इंदापूर, अकलूज, माळीनगर आणि बाजीराव विहीर या ठिकाणी वारकऱ्यांचे मुख्य आकर्षण असलेली रिंगणे पार पडणार आहेत. विशेष म्हणजे १७ जुलै रोजी बेलवडी येथे आणि २० जुलै रोजी माळीनगर येथे गोल रिंगण सोहळा रंगणार आहे. तर निमगाव केतकी आणि वाखरी येथे उभ्या रिंगणाचे आयोजन करण्यात आले आहे. या रिंगण सोहळ्यांचा नयनरम्य अनुभव घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालखी सोहळा विनाअडथळा पार पडावा यासाठी देहू संस्थान तसेच स्थानिक प्रशासनाने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारीच्या मार्गावरील रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, आरोग्य यंत्रणा आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. यंदा मान्सूनचे आगमन वेळेत होण्याची शक्यता असल्याने वारीदरम्यान वारकऱ्यांना उन्हाचा त्रास कमी होईल, अशी चिन्हे आहेत. विठ्ठल भक्तांना वारीचे अचूक नियोजन करता यावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून लवकरच या वेळापत्रकाची सविस्तर पुस्तिका आणि मार्गिका अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.
