Raj Thackeray On PM Narendra Modi | ‘तुमची मन की बात खूप झाली, आता तज्ज्ञांचं ऐका’; राज ठाकरे कडाडले
मुंबई : Raj Thackeray On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना संबोधित करताना आगामी काळात सोन्याची खरेदी टाळण्याचे, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे वाढते तेलाचे भाव आणि विदेशी गंगाजळीवर पडणारा ताण हे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत खरमरीत टीका केली असून, ‘तुमची ‘मन की बात’ खूप झाली, आता खऱ्या अर्थतज्ज्ञांचे ऐका,’ असा सल्ला दिला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पत्र प्रसिद्ध करत सरकारला अनेक सवाल विचारले आहेत. त्यांनी विचारले आहे की, “जर देशाला काटकसर करायला सांगत असाल, तर स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन आणि स्वतःवर फुले उधळून घेत मिरवणुका का काढत आहेत?” तसेच, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होते, तेव्हा सरकारने जनतेकडून जो हजारो कोटींचा टॅक्स वसूल केला, तो पैसा कुठे गेला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरेंनी थेट केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘रेवडी’ संस्कृतीवरही निशाणा साधला. निवडणुका जिंकण्यासाठी ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांमधून पैसे वाटून राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘आधी स्वतःच्या पक्षापासून आणि सरकारी उधळपट्टीपासून काटकसर सुरू करा, मग जनतेला उपदेश द्या,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा दाखला देत म्हटले की, त्यांनी कधीही अशा प्रकारचे आवाहन करून जनतेला घाबरवले नाही. “देशाची अर्थव्यवस्था वरून सुदृढ वाटत असली तरी आतून कमकुवत झाली आहे, हे एकदा मान्य करा,” असे म्हणत त्यांनी या परिस्थितीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या टीकेमुळे सध्या महायुती आणि मनसे यांच्यातील राजकीय संबंधांवर पुन्हा एकदा चर्चेची राळ उडाली आहे.
