Sandeep Khardekar | जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंगबाबत तातडीने निर्णय घ्या; संदीप खर्डेकर यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

Sandeep Khardekar | Take an immediate decision regarding mechanized parking on Jangli Maharaj Road; Sandeep Khardekar's demand to the Municipal Commissioner

पुणे : Sandeep Khardekar | जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर उभारण्यात आलेल्या मॅकेनाईज्ड पार्किंगबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

संदीप खर्डेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जंगली महाराज रस्त्यावर २००७ साली उभारण्यात आलेले मॅकेनाईज्ड पार्किंग अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. हे पार्किंग उभारल्यानंतरही त्याचा अत्यल्प वापर झाला. त्या काळात यांत्रिक पार्किंगबाबत नागरिकांच्या मनात शंका होत्या, तसेच त्या वेळी पार्किंगचा प्रश्नही आजच्या तुलनेत एवढा गंभीर नव्हता.

खर्डेकर यांनी पुढे नमूद केले की, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना त्यांनी या प्रकल्पाला ‘पांढरा हत्ती’ ठरवत महापालिकेविरोधात आंदोलनही केले होते. मात्र, गेल्या जवळपास वीस वर्षांच्या कालावधीत निम्म्याहून अधिक काळ हे पार्किंग बंद अवस्थेतच आहे.

दोन वर्षांपूर्वी या विषयावर पाठपुरावा केला असता, मेट्रो प्रशासनासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्या हे पार्किंग विनावापर पडून असून त्याभोवती कचरा साचल्याचे दिसून येत आहे, असे खर्डेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

जाणकारांच्या मते, सध्याच्या वाहनांचा आकार वाढल्यामुळे या यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरणे कठीण आहे. तसेच आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प फायदेशीर ठरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या पार्किंगचे नूतनीकरण करणे म्हणजे पुन्हा एकदा नव्याने ‘पांढरा हत्ती’ पोसण्यासारखे ठरेल, अशी भूमिका खर्डेकर यांनी मांडली आहे.

या पार्श्वभूमीवर जंगली महाराज रस्त्यावरील विनावापर पडून असलेल्या मॅकेनाईज्ड पार्किंगबाबत पुणे महापालिकेने तातडीने योग्य आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

You may have missed