ST Bus Ticket Hike | डिझेल दरवाढीचा एसटी महामंडळाला फटका; तिकीट दरवाढीचे प्रताप सरनाईकांकडून संकेत

ST Bus Ticket Hike | Diesel price hike hits ST Corporation; Pratap Sarnaik hints at ticket price hike

मुंबई : ST Bus Ticket Hike |  पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका आता एसटी महामंडळालाही बसण्याची शक्यता आहे. डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे महामंडळावर सुमारे १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे. त्यामुळे एसटी बसच्या तिकीट दरात वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काही निर्णय कटू असले तरी परिस्थितीनुसार ते घ्यावे लागतील. महागाई अशीच वाढत राहिली, तर एसटी महामंडळ टिकवण्यासाठी आणि सक्षम ठेवण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे अपरिहार्य ठरेल. महामंडळातील सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांचे पगार, बससेवा आणि प्रवाशांसाठीच्या सुविधा सुरू ठेवणे ही मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या एसटी महामंडळाच्या १४ हजार २५० बस रस्त्यावर धावत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महिला प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचे पैसे राज्य शासनाकडून महामंडळाला मिळतात. तसेच दिव्यांग, समाजातील काही घटक आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत प्रवासाची भरपाईही शासनाकडून केली जाते. मात्र, एसटी महामंडळाला कायमस्वरूपी सक्षम करण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहता येणार नाही, असे सरनाईक यांनी सांगितले.

नवीन बस खरेदी, एसटी स्थानकांची उभारणी, दुरुस्ती, सुधारणा आणि इतर सुविधांसाठी महामंडळाला शासनाकडे निधी मागावा लागतो. त्यामुळे भविष्यात महामंडळाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सध्या महामंडळाने ८ हजार डिझेल बस घेतल्या असल्या तरी आगामी काळात इलेक्ट्रिक बस खरेदीवर भर दिला जाणार आहे. या बससाठी राज्यभरात २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी आणि महापालिकांच्या पुलाखालील मोकळ्या जागांचा वापर ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या जागा एसटी महामंडळाला उपलब्ध झाल्यास तेथे चार्जिंग स्टेशन उभारून राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देता येईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

You may have missed