Vaishali Murlidhar Totewar | 28 लाखांची लाच घेणाऱ्या वैशाली तोटेवार यांना पुणे आयुक्त अमितेश कुमार करणार निलंबित; कार्यमुक्त केल्याचा आदेश करणार रदद्
पुणे : Vaishali Murlidhar Totewar | आर्थिक गुन्हे शाखेतील बढतीवर बदली झाली असताना, पुण्यातून कार्यमुक्त करणार्याचा आदेश दिला असतानाही २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यमुक्त केल्याचा आदेश रद्द करुन त्यांना आज निलंबित करण्यात येणार असल्याचे समजते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. लाच घेताना पकडल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सर्च घेऊन लाच संबंधित प्रकरणाची फाईल जप्त करण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार API Vaishali Totewar | (वय ४९, रा़ ऑफिसर क्वार्टर, स्वारगेट पोलीस लाइन,स्वारगेट) आणि खासगी व्यक्ती संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७, रा. सदाशिव पेठ, चिमण्या गणपती चौक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार हिची पोलीस निरीक्षकपदी लोहमार्ग, मुंबई येथे बदली झाल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यमुक्त करण्याचा आदेश काढला होता. परंतु, वैशाली तोटेवार यांनी आपल्या खात्यातून कार्यमुक्त केल्याचा मेमो घेऊन आपल्याकडील सर्व प्रलंबित प्रकरणे दुसर्यांकडे हस्तांतरीत करायचे काम बाकी होते. त्यांनी कार्यालयात येऊन ते काम करणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी ते करण्याऐवजी लाच मागण्याचे काम अगोदर केले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी कार्यमुक्त करण्याचा आदेश काढला असला तरी तांत्रिक बाबी पूर्ण न झाल्याने आता पोलीस आयुक्त आपला आदेश रद्द करुन वैशाली तोटेवार यांना निलंबित करणार असल्याचे समजते.
वैशाली तोटेवार या मुळच्या नागपूर येथील राहणार्या असून त्यांनी यापूर्वी खडक पोलीस ठाण्यात काम पाहिले होते. सध्या त्या स्वारगेट पोलीस लाइनमध्ये राहण्यास होत्या. खासगी व्यक्ती संभाजी चव्हाण हा त्यांच्या ओळखीचा असून त्याचा मार्केटयार्ड येथे गाळा आहे.
तक्रारदार यांच्या अर्जावर सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार या तपास करीत होत्या. त्यातील आरोपींविरुद्ध कारवाई करुन तक्रारदार यांची जमीन त्यांना परत मिळवुन देते, या करीता त्यांनी तक्रारदार यांच्याकडून अगोदर २ लाख रुपये स्वीकारले होते. आणखी ३० लाखांची मागणी त्यांनी केली होती. त्याची तक्रार ३० एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्याच दिवशी पडताळणी केली असता वैशाली तोटेवार हिने या अगोदर २ लाख रुपये घेतल्याचे मान्य केले. तडजोडीअंती २८ लाख रुपये स्वीकारण्याचे कबुल केले. खासगी व्यक्ती संभाजी चव्हाण याच्यामार्फत लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानुसार २ मे रोजी सापळा कारवाई करण्यात आली. त्यात वैशाली तोटेवार हिने संभाजी चव्हाण याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉनराडच्या गेटसमोर तक्रारदार यांच्याकडून २८ लाख रुपये स्वीकारताना संभाजी चव्हाण याला पकडले. त्यानंतर वैशाली तोटेवार यांना ताब्यात घेण्यात आले होते.
