Pune Crime News | गुन्हे दाखल असताना बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणार्‍या ठेकेदार विठ्ठल पोळेकर खुन प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | डोणजे येथे राहणार्‍या गुन्हे नावावर असतानाही लोणी काळभोरमधील पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविणार्‍या गुन्हेगारावर बनावट कागदपत्रे दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित ऊर्फ बाळा किसन भामे Rohit alias Bala Kisan Bhame (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचा खुन केल्याप्रकरणात सध्या तो कारागृहात आहे.

गँगस्टर नीलेश घायवळ याच्यासह अनेक गुंडांनी बनावट कागदपत्रे देऊन मधल्या काळात शस्त्र परवाने मिळविले होते. या सर्व शस्त्र परवान्यांची सध्या चौकशी करण्यात येत आहे. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार तेज भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रोहित भामे याने २०२३ मध्ये शस्त्र परवाना मिळविला आहे. भामे याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याने नवीन शस्त्र परवाना मिळविण्याकरीता लोणी काळभोर येथील तरवडी रानमळा येथील पुरावा म्हणून आधार कार्ड सादर केले. तसेच हमीपत्र व इतर कागदपत्रे सादर केली होती. हमी पत्रामध्ये त्याच्याविरुद्ध कोणत्याही कोर्टात दिवाणी किंवा फौजदार खटला सुरु नसल्याचे नमूद केले होते. या आधारकार्ड व हमीपत्राच्या आधारे त्याने तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना मिळवला आहे.

रोहित भामे याने शस्त्र परवाना मिळण्यासाठी दिलेल्या पत्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक स्मिता पाटील व सहकारी यांनी जाऊन चौकशी केली. रोहित भामे हा तरवडी रानमळा येथे कधीही वास्तव्यास राहिलेला नाही. आधार कार्डावरील पत्ता खोटा आहे, असे तेथे चौकशी केल्यावर पोलिसांना समजले.

रोहित भामे याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये २ गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे दाखल असताना त्याची माहिती लपवून खोटे हमी पत्र सादर करुन ३२ बोर पिस्टलचा परवाना मिळवला असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेत असताना तो कारागृहात असल्याची माहिती मिळाली.

शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन त्यांचा खुन केल्याच्या प्रकरणात हवेली पोलीस ठाण्यात त्याच्यावर २०२४ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो कारागृहात आहे. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे तपास करीत आहेत.

You may have missed