Pune ACB Trap Case | लाच घेताना सापळा कारवाईची चाहूल लागल्याने पळून गेलेला पोलीस हवालदार दीड महिन्याने अटकेत
पुणे: Pune ACB Trap Case | गुन्ह्यात अटक न करण्याची व गुन्ह्यात मदत करण्यासाठी ९५ हजारांची लाच घेताना सापळा कारवाईची चाहूल लागल्याने पळून गेलेल्या पोलीस हवालदाराला दीड महिन्यानंतर अटक करण्यात लाच लुचपत विभागाला यश आले आहे.
सतीश नाथराव मुंढे Satish Natharao Mundhe (वय ४५) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शिरूर पोलीस ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवसात दोन कारवाया केल्या होत्या. सतीश मुंढे याच्याकडे असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदारास अटक न करण्यासाठी व दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी सतीश मुंढे याने १ लाख रुपये मागितले होते. लाच पडताळणीत त्याने ९५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ९५ हजार घेतल्यावर त्याला याचा सुगावा लागला. तो ९५ हजार रुपये व तक्रारदाराकडील कागदपत्रे घेऊन पळून गेला होता.
पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी त्याला आज १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शिरूर नगर परिषद परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करून विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
