Pune Crime News | पाणी भरण्यावरून झालेल्या वादात तरुणाच्या छातीत चाकूने वार करून तरुणाचा खून; बालेवाडीमधील घटनेतील हल्लेखोर वेटरला अटक
पुणे : Pune Crime News | नळावर पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून वेटरने चाकूने वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
करण राजू करपे (वय १९, रा. बालेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बाणेर पोलिसांनी प्रतिक संतोष मानकर Pratik Santosh Mankar (वय २१, रा. परफेक्ट सोसायटीसमोर, बालेवाडी) याला अटक केली आहे. याबाबत केरबा शिंदे (वय ४७, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हि घटना बालेवाडी येथील परफेक्ट सोसायटीसमोर, राजू बालवडकर यांच्या चाळीमध्ये १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक मानकर हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. राजू बालवडकर यांच्या चाळीत पाणी भरण्यावरून करण आणि प्रतिक यांच्यात भांडणे झाली. फिर्यादी हे प्रतिक याला समजावून सांगत असताना प्रतिक हा घरात गेला. तो कांदा कापण्याचा चाकू घेऊन आला. त्याने फिर्यादी, त्यांचा मुलगा यांना मारहाण केली. करण याच्या छातीत वार केला. त्यात करण गंभीर जखमी झाला. त्याला सिम्बायोसिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असताना रविवारी रात्री त्यांचा मूत्यू झाला. बाणेर पोलिसांनी अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून प्रतिक मानकर याला अटक केली आहे. त्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.
