Pune News | गांधी-नेहरू यांच्या विचारांमुळे लोकशाही आजही मजबूत; रमणिक मुनीजी महाराजसाहेब
पुणे : Pune News | महात्मा गांधींनी घडविलेली अहिंसक मने आणि द्वेष भावना न ठेवता पंडित नेहरू यांनी केलेली भारताची उभारणी यामुळेच येथील लोकशाही आजही मजबूत आहे, असे प्रतिपादन रमणिक मुनीजी महाराजसाहेब यांनी केले.
पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त पु शिवशंकर सभागृहात ‘महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि आपण’ या विषयावर रमणिक मुनिजी महाराजसाहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा तसेच भारताच्या लोकशाही आणि उदारमतवादी परंपरेचा ऊहापोह रमणिक मुनीजी महाराजसाहेब यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केला.
भगवान महावीरांनी सांगितलेली अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि अनेकांतवाद ही तत्त्वे गांधीजींनी आपल्या आचरणातून जगासमोर ठेवली, तर त्यांचे वैचारिक उत्तराधिकारी नेहरूंनी ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या मूल्यांच्या प्रेरणेतून आधुनिक भारताच्या निर्मितीला दिशा दिली, असे सांगून ते म्हणाले, भारतासोबत अनेक देश स्वतंत्र झाले; मात्र त्यापैकी अनेक देशांत लोकशाही व्यवस्था टिकू शकली नाही. भारताची लोकशाही आजही मजबूत आहे, यामागे गांधीजींनी घडवलेली अहिंसक मने आणि नेहरूंनी द्वेषभावना न ठेवता केलेली आधुनिक भारताची उभारणी ही महत्त्वाची कारणे आहेत.
द्वेष आणि हिंसेला घाबरून आपणही समोरच्यासारखे न होता, अहिंसा आणि प्रेमाच्या मार्गाने त्यावर विजय मिळवला पाहिजे,” असा प्रेरणादायी संदेश रमणिक मुनीजी महाराजसाहेब यांनी दिला. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदादा जोशी आणि नोईंग गांधी ग्लोबल फ्रेंड्स चे संकेत मुनोत यांनी केले होते. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, पुणे शहर काँग्रेस (पूर्व) चे प्रशांत जगताप, श्रीपाल ललवाणी, निलेश नवलाखा, राजकुमार चोरडिया, संतोष ललवाणी, चेतन अगरवाल, पुष्कर अबनावे, विकास सुपनार, आयूब पठाण, सुरेश कांबळे, अविनाश अडसूळ, ॲड.प्राजक्ता जाधव, संजय वावळे राजू जगताप, आशीष वाघमारे यांच्यासह काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
