Pune Crime News | आरडा-ओरडा करू नका म्हटल्याने तरुणावर कोयते, सत्तूर काठ्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न; गाड्यांच्या काचा फोडून माजवली दहशत
पुणे: Pune Crime News | रात्री आरडा ओरडा करणाऱ्या टोळक्याला आरडा ओरडा करू नका, म्हटल्याने त्यांनी तरुणावर कोयते, सत्तूर काठ्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परिसरातील गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली. बारामती शहर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत अमोल शांताराम बनकर (वय ४५, रा. बनकर वस्ती, पाटस रोड, बारामती) हे गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी गणेश संतोष दुधे Ganesh Santosh Dudhe (वय १८, रा. पाटस रोड, बारामती) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार जय लोंढे, आशिष शेलार, प्रथमेश उर्फ पट्ट्या धीवार, वैभव कांबळे, प्रेम लोंढे व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बनकर यांचे कार वाशिंग सेंटर आहे. रात्री ते जेवण झाल्यावर शतपावली करत होते. त्यावेळी काही जण ४ ते५ मोटार सायकलीवरून आले. त्यांच्या हातात कोयते, सत्तूर, काठ्या होत्या. ते आरडा ओरडा करू लागले. त्यांचा पुतण्या सोहम बनकर तेथे आला. तेव्हा अमोल बनकर जय लोंढे याला तू इथे गोंधळ घालू नको. त्यावर जय म्हणाला, मी इथला भाई आहे. तू मला शिकवतो का, थांब तुझा गेमच करतो, असे म्हणून त्याने हातातील कोयत्याने अमोल यांच्या डोक्यात वार केला. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या सोहमच्या खांद्यावर वार केला. त्यांनी आरडा ओरडा केला. त्यामुळे लोक जमा झाले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला लागला तर परिणाम वाईट होतील, असे म्हणून त्यांनी तेथे पार्क केलेल्या कार, दुचाकी गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवत पळून गेले. अमोल आणि सोहम बनकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले तपास करीत आहेत.
