Pune Crime News | पुणे : दहशत माजविण्यासाठी अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार करुन मागितली खंडणी; चार अल्पवयीन मुलांकडून 2 पिस्टल, 3 जिवंत काडतुसे जप्त
पुणे : Pune Crime News | १५ दिवसांपूर्वी बालसुधारगृहातून बाहेर आलेल्या अल्पवयीन मुलाने साथीदारांसह खंडणी उकळण्यासाठी हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण केली. स्वारगेट पोलिसांनी तातडीने रात्रीत या चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
याबाबत सागर मल्लीकार्जुन शेखापुरे (वय २९, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत शुक्रवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही गुन्हेगार अल्पवयीन आहेत. ते वडगाव बुद्रुक, नर्हे, गुलटेकडी येथील राहणारे आहेत. त्यांच्यातील प्रमुख अल्पवयीन गुन्हेगार मुलगा हा सिंहगड रोडवर गेल्या वर्षी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता. तो बाल सुधारगृहातून १५ दिवसांपूर्वी सुटला होता. हे चौघे जण शुक्रवारी रात्री गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत आले. त्यातील प्रमुख अल्पवयीन गुन्हेगाराने आपल्याकडील पिस्टलातून हवेमध्ये गोळीबार करुन ‘‘आम्ही इथले भाई आहोत, या ठिकाणी आमचेच चालणार, मी आत्ताच एकाचा मर्डर करुन बाहेर आलो आहे. इथे रहायचे असेल तर मला दर महा १० हजार रुपये द्यावे लागतील,’’ असे मोठमोठ्याने ओरडून दहशत पसरवली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांच्या हातामध्ये असलेले धारदार लोखंडी शस्त्रे हवेमध्ये फिरवून दहशत माजवली.
या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, सहायक पोलीस निरीक्षक नामदे, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, सद्दाम शेख, राकेश सुर्वे यांनी या चौघांचा शोध घेऊन त्यांना जांभुळवाडी येथील श्री साई अपार्टमेंट येथून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांनी ही माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील अधिक तपास करीत आहेत.
