BalDin Pune | मायेचा स्पर्श अन् आनंदाचा उत्सव! कोथरुडमधील 1000 हून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळा

Children's Day Pune | The touch of love and a celebration of joy! A unique Children's Day event for over 1000 newborns in Kothrud

चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमामुळे अनेक मातांच्या आयुष्यात सुरक्षित मातृत्वाचा आनंद

BalDin Pune | आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि भावनिक क्षण असतो. मात्र, आर्थिक परिस्थिती आणि आरोग्यविषयक अडचणींमुळे अनेक महिलांसाठी हा प्रवास चिंतेचा आणि संघर्षाचा ठरतो. अशा महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करत, त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासाला सुरक्षिततेची साथ देण्याचे मोलाचे काम कोथरुडमध्ये सुरू आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सखी–सुखदा फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरुडमधील वस्ती भागातील गरोदर मातांना सुरक्षित प्रसूतीसाठी मदतीचा हात दिला जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत १००० हून अधिक मातांची सुखरूप प्रसूती झाली असून, अनेक कुटुंबांच्या आयुष्यात चिमुकल्यांच्या आगमनाने आनंद फुलला आहे.

या उपक्रमातून जन्माला आलेल्या चिमुकल्यांसाठी बालदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व नवजात बालकांना खेळणी आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा निरागस आनंद आणि त्यांच्या मातांच्या डोळ्यांतील समाधान या सोहळ्याचे खरे वैशिष्ट्य ठरले.

हा केवळ बालदिनाचा उत्सव नव्हता, तर सुरक्षित मातृत्वाच्या प्रवासातून जन्माला आलेल्या नव्या आयुष्याचा आनंद साजरा करण्याचा एक हृदयस्पर्शी क्षण होता. ज्या मातांच्या मनात कधीकाळी प्रसूतीबाबत चिंता होती, त्यांच्याच कुशीत आज निरोगी बाळांचे हास्य फुलले आहे. त्या प्रत्येक बाळाच्या आगमनामागे मायेची साथ, काळजी आणि सामाजिक बांधिलकीची भावना आहे.

एका सुरक्षित प्रसूतीतून एका कुटुंबाला आनंद मिळतो; पण अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे वस्ती भागातील गरोदर महिलांची सुरक्षित प्रसूती होताना, कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकरातून सखी-सुखदा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमामुळे १००० हून अधिक मातांच्या आयुष्यात आनंद फुलला आहे. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीचा उत्सव आहे, अशी भावना उपक्रमाच्या संचालिका स्मिता पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी चिमुकल्यांच्या हास्यातून आणि मातांच्या चेहऱ्यावरील समाधानातून या उपक्रमाचे यश अधोरेखित झाले. प्रत्येक बाळाला सुरक्षित जन्माचा हक्क आणि प्रत्येक आईला सुरक्षित मातृत्वाचा आधार मिळावा, या भावनेतून राबवला जाणारा हा उपक्रम समाजापुढे माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा सुंदर आदर्श निर्माण करत आहे.

बालदिनाच्या कार्यक्रमासाठी सुरेखा जगताप, डॉ. मुग्धा धायगुडे, धनश्री चितळे, अस्मिता शिंदे, वृषाली मोरे, वैष्णवी केंडे, पौर्णिमा सोनार यांनी विशेष मेहनत घेतली.

You may have missed